ऐन हिवाळ्यात गोवा-दिल्ली मार्गावर सोडलेल्या ‘राजधानी एक्स्प्रेस’ला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला. या गाडीचे आरक्षण सुरू होताच अवघ्या काही मिनिटांतच ही गाडी हाऊसफूल झाली असून, प्रतीक्षा यादी सुमारे दीडशेच्या घरात पोहोचली आहे. याशिवाय उत्तम आसन व्यवस्था, रुचकर जेवण आणि सुसाट वेग, यामुळे येत्या काळात या सेवेला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
गोवा ते दिल्ली मार्गावर धावणारी राजधानी एक्स्प्रेस ही देशातील २२ वी राजधानी सेवा आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या गाडीला रविवारी हिरवा कंदील दाखवला. ही गाडी आठवडय़ातून दोनदा सोडण्यात येणार असून हजरत निजामुद्दीन स्थानकातून शुक्रवारी व शनिवारी तर मडगाव स्थानकातून रविवारी व सोमवारी सुटणार आहे. या गाडीला थिविम, कुडाळ, रत्नागिरी, पनवेल वसई रोड आदी थांबे देण्यात आले आहेत.

रोज गोवाहून दिल्लीला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यातील अनेक प्रवासी विमानाने प्रवास करतात. मात्र हिवाळ्यात धुके पडत असल्याने अनेक वेळा उड्डाणे रद्द होतात. त्यामुळे हे सर्व प्रवासी राजधानीकडे वळतील. विमानाच्या तिकिटांच्या तुलनेत राजधानीचे तिकीट कमी आहे, असा दावा कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलगू यांनी केला.