घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन साधनांच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून या प्रदर्शनाची मुदत एक दिवस वाढवण्यात आली असून सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईकरांना हे प्रदर्शन पाहून स्वत:साठी योग्य तो पर्याय निवडता येईल. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे १ सप्टेंबरपासून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

दरदिवशी १०० किलोहून अधिक कचरा गोळा होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमधून दोन ऑक्टोबरनंतर कचरा उचलला जाणार नसल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. सोसायटीत गोळा होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातील काही पर्याय महानगरपालिकेने आयोजित केलेल्या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनात सुमारे ६० कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यात वैयक्तिक पातळीवर घरातल्या घरात वापरण्याचे तसेच सोसायटीसाठी वापरता येणारे पर्याय आहेत. घरातल्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून देणारे प्लास्टिकचे बास्केट, केवळ ओला कचरा टाकून दिवसातून दोन वेळा ड्रम फिरवून महिनाअखेरीस खत तयार करण्याचा पर्याय या प्रदर्शनात आहेत. त्याचप्रमाणे टेट्रापॅकपासून मजबूत फर्निचर, प्लास्टिकपासून तोरणे असे पर्यायही आहेत.

गांडूळखत निर्मितीच्या पारंपरिक पद्धतीसोबतच वीजनिर्मिती करणारे अत्याधुनिक पद्धतीचे स्वयंचलित यंत्रही या प्रदर्शनात आहे. घरानुसार महिन्याला २०० रुपये शुल्कात कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्याही या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक सोसायटीला आर्थिक क्षमतेनुसार तसेच गरजेनुसार पर्याय देणाऱ्या या प्रदर्शनाला रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. घनकचरा व्यवस्थापनाची गरज आणि लोकांची उत्सुकता यामुळे हे प्रदर्शन सोमवारीही सुरू राहील.