News Flash

बेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित

बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपदान आणि अंतिम देयकाचा मुद्दा समितीच्या बैठकीत उपस्थित केला.

बेस्ट उपक्रमाची सेवा पूर्ण केल्यानंतरही सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना उपदानाची (गॅ्रच्युटी) आणि अंतिम देयकाची रक्कम दिली जाते. परंतु मागील दीड वर्षांपासून बेस्टच्या सेवेतून निवृत्त झालेल्या चार हजार ९०० कर्मचाऱ्यांना उपदान आणि अंतिम देयकाची रक्कमच मिळालेली नसल्याची माहिती शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेतून समोर आली. ही रक्कम त्वरित देण्यात यावी, अशी मागणी समितीतील काही सदस्यांनी केली. मात्र बैठकीत यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे उपदानाचा प्रश्न त्वरित मार्गी लागणार नाही, हे स्पष्ट झाले. या बैठकीत शिवसेना आणि भाजपमध्ये असलेले मतभेद मात्र पुन्हा समोर आले.

बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपदान आणि अंतिम देयकाचा मुद्दा समितीच्या बैठकीत उपस्थित केला. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या उपदान आणि अंतिम देयकाच्या रकमेमधून मुलांचे शिक्षण, लग्न, नवीन घर खरेदी इत्यादी कर्तव्ये पार पाडतात. परंतु ही रक्कम वेळेवर न मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंबाप्रति असलेली कर्तव्य पार पाडू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ यांनी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. या वेळी भाजपकडून करण्यात आलेली सभा तहकुबीची मागणी अमान्य करण्यात आल्याने त्यावर मतदान घेण्यात आले. शिवसेना, काँग्रेसकडून विरोधात मतदान करण्यात आल्याने भाजप एकाकी पडले आणि भाजप सदस्यांनी सभात्यागच केला. बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे आणि सदस्य सुनील गणाचार्य यांच्यात खडाजंगी झाली. तर बागडे यांनी उपदानाची रक्कम टप्प्याटप्याने देण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

,९०० सेवानिवृत्त कर्मचारी प्रतिक्षेत

जवळपास ४,९०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदानाची आणि अंतिम देयकाची रक्कम मिळालेली नाही. ही एकूण रक्कम २६५ कोटी रुपये एवढी आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान कायद्यानुसार (ग्रॅच्युटी अ‍ॅक्ट)वेळेत उपदानाची रक्कम देणे बंधनकारक आहे. असे असतानाही बेस्टकडून ही रक्कम देण्यास विलंब केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा निषेध करण्यासाठी होणारी समितीची बैठक कोणतेही कामकाज न पार पाडता तहकूब करण्याची मागणीदेखील करण्यात आली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही टीका करताना यातून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:14 am

Web Title: best retired staff still not get gratuity amount
Next Stories
1 आणखी किती बळी जाणार?
2 ‘कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध आहे का?’
3 आम्ही मुंबईकर : व्रतस्थ तरुणांची चाळ
Just Now!
X