29 May 2020

News Flash

वातानुकूलित मिनी बस सेवेत

शहरातील सार्वजनिक वाहतूक साधनांना जोडणारी सेवा पुरवणार

शहरातील सार्वजनिक वाहतूक साधनांना जोडणारी सेवा पुरवणार

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी सुविधेत आमूलाग्र बदल करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाने सोमवारी मुंबईत पाच वातानुकूलित ‘मिनी बस’ दाखल केल्या. मेट्रो, मोनो आणि रेल्वे स्थानके यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर या बस प्रामुख्याने प्रवासी सुविधा पुरवणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मिनी बसगाडय़ा उपयुक्त ठरतील, अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यावेळी दिली. सध्याच्या बसला एका किलोमीटरसाठी ११० रुपये खर्च येतो. परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न खूपच अल्प आहे. उलट भाडेतत्त्वावरील मिनी बसला एका किलोमीटरमागे ८० ते ८५ रुपये पडतात. त्यामुळे त्या बेस्टसाठी किफायतशीर ठरतील, अशी अपेक्षा परदेशी यांनी व्यक्त केली. लवकरच बेस्टच्या भाडेतत्त्वावरील तीन हजार बसगाडय़ा दाखल होणार असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी येत्या जानेवारीपर्यंत एक हजार नवीन आणि ३०० विजेवरील बसगाडय़ा येणार असल्याची माहिती दिली. त्यापैकी ५० सप्टेंबरमध्ये, २०० ऑक्टोबरमध्ये, प्रत्येकी २५० डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात दाखल होतील. मार्चपर्यंत ३४० वातानुकूलित विजेवरील बसगाडय़ा येतील.

या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर आदी उपस्थित होते. उद्घाटन केलेल्या मिनी बसगाडय़ा सेवेत येण्यासाठी आठवडय़ाचा कालावधी लागेल. २१ आसन असलेल्या मिनी बसमध्ये वाहक नसेल.

बेस्टचा वेग वाढला

पालिकेच्या नवीन पार्किंग धोरणानुसार रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडय़ांना मोठय़ा प्रमाणात दंड आकारला जात आहे. मुंबईकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी त्याचा फायदा बेस्टला व खासगी वाहन चालकांनाही झाल्याचा दावा परदेशी यांनी केला. वाहनांचे बेकायदा पार्किंग कमी झाल्याने ‘बेस्ट’ बसगाडय़ांचा सरासरी वेग पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्याचा दावा  त्यांनी केला.

५०० बसगाडय़ांचा प्रस्ताव मंजूर

सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत ५०० बसगाडय़ांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामध्ये चालक कंत्राटदाराचा व वाहक बेस्ट उपक्रमाचा असेल. प्रवाशांना तिकीट देण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून कॉमन मोबॅलिटी कार्ड सुरू करण्याचा प्रयत्न असून प्रवासी आपले तिकीट ऑनलाइनही काढू शकतील, असे सुरेंद्रकुमार बागडे यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 3:26 am

Web Title: best start air conditioned mini bus service zws 70
Next Stories
1 ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ?
2 पुनर्विकास अध्यादेश विकासकधार्जिणा!
3 संक्रमण शिबिरातील घुसखोर अधिकृत
Just Now!
X