बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने नवव्या दिवशीही संप सुरु आहे. आज संप मिटेल या आशेने घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना आजही त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान संपावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यानंतर संपाबाबत निर्णय होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुटण्याची चिन्हे नाहीत आणि संप सोडवण्याची सरकारची इच्छाशक्तीच नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया मुंबईकरांमध्ये उमटत आहे.

आठवडा उलटूनही संप कायम असल्याने ‘बेस्ट’चे चाक रूतलेलेच असून राजकीय हालचालींचे वारू मात्र चौखूर उधळले आहे. न्यायालयाने बुधवापर्यंतची अंतिम संधी देऊनही संप मागे घेणार नसल्याचे बेस्ट कामगार संयुक्त कृतीसमितीने जाहीर केले आहे. त्याचवेळी महापालिका आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच हा संप चिघळत असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. या संपाने शिवसेना खिंडीत सापडल्याने यामागे राजकीय गणितेच असल्याचा आरोप होत आहे.

या संपावर तोडगा निघत नाही, याबाबत मुंबईकरांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. आंदोलक शशांक राव हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे नेते या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेकदा विविध मुद्दय़ांवर चर्चा करतात. पण हा संप सुरू झाल्यापासून उभय नेत्यांनी एकदाही चर्चा केलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी ‘पहारेकरी’ म्हणविणाऱ्या भाजपचे आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधले, असा सवालही केला जात आहे. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा बैठका घेऊनही संप कायम आहे, हेदेखील सूचक आहे. त्यामुळे युती तोडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी सरकार आणि पाठोपाठ महापालिका प्रशासन संपाची मूक साक्षीदार म्हणून वावरत आहे, अशी टीका होत आहे.

बेस्टमधील कामगार संघटना आणि महापालिका प्रशासनासमोर शिवसेना हतबल ठरल्याचे दिसत आहे. ठाकरे यांच्या तुलनेत निम्मा अनुभव असलेल्या शशांक राव यांच्यासारख्या तरुण नेत्यानेही उद्धव ठाकरे यांना दाद दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हतबल असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. शिवसेनेस ‘पटकण्याचा’ भाजपचा पहिला प्रयोग बेस्टच्या संपातूनच सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे नागरिक भरडले जात असून त्याचा दुष्परिणाम भाजपच्या वाटय़ाला येण्याचीही भीती काही नेत्यांना वाटू लागली आहे.

आमची मुंबई, आमची बेस्टचे समन्वयक विद्याधर दाते यांनी सरकार बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप लांबवत असल्याचा आरोप केला. मुळातच संपावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयात जाण्याची गरज नव्हती. मुंबईकरांचे हाल होत आहेत आणि यावर तोडगा निघत नाही हे न पटण्यासारखेच आहे. बेस्ट उपक्रमासाठी अनुदान देण्यात यावे, स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यात याव्यात इत्यादी मागण्या पालिका व बेस्ट उपक्रमाकडे केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दाते म्हणाले.

मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी संप मिटत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधले असाच सवाल उपस्थित होत असल्याचे व्यक्त केले. मुळातच सरकारची इच्छाशक्तीच नाही हेच दिसून आल्याची टीका देशपांडे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही यापूर्वीच पत्र देताना कर्मचाऱ्यांचा तंटा औद्योगिक विवाद कायद्यातील तरतुदीनुसार लवादाकडे निवाडय़ासाठी सोपवावा, अशी मागणी केली होती. त्याकडेही दुर्लक्षच केल्याचे सांगितले. वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका करताना आता सरकार जनतेची नाराजी ओढावून घेत असल्याचे मांडले.