बेस्ट संपाचा आज सातवा दिवस असून मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. पालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. दरम्यान संपाबाबत दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.

राज्य सरकारने याप्रश्नी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नेमून त्याआधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीमध्ये झालेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. संपाबाबत न्यायालय कोणते आदेश देते याकडे कामगार संघटनांसह सर्वाचेच लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट संपाबाबत चर्चेतूनच मार्ग काढूया, असे आवाहन रविवारी केले. या संपात मला राजकारण करायचे नाही. मात्र, अवाजवी मागण्या केल्या तर आणखी समस्या निर्माण होतील, असे ठाकरे म्हणाले. संपावर असलेल्या एकाही ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या संपातून मार्ग निघणे गरजेचे असून आम्ही सर्वाशी चर्चा केली, मात्र मार्ग निघू शकला नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली.

दरम्यान मनसेने या संपात उडी घेतली असून तोडगा काढला नाही तर मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला देण्यात आला आहे. संपामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवासानंतर कार्यालयात जाण्या-येण्यासाठी पायपीट करीत किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे.

कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आदी विविध मागण्यांसाठी गेल्या सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पालिका आणि बेस्ट प्रशासन तसेच शिवसेनेच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतरही या संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

बेस्ट प्रशासनाने मेस्मासह कर्मचारी वसाहतीतील घरे रिकामी करण्याची नोटीस दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी माघारीचे पाऊल घेतलेले नाही. दरम्यान आता ओला-उबेर चालकांनीही संपाचा इशारा दिल्यामुळे मुंबईकर धास्तावले आहेत.

ठाणे, नवी मुंबईतील प्रवाशांनाही मनस्ताप
या संपामुळे सध्या शहरासह मीरारोड, भाईंदर, ठाणे, नवी मुंबईपर्यंतची बससेवा ठप्प झाली आहे. बेस्टच्या रोजच्या २५ ते ३० लाख प्रवाशांना या संपामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून चालक, वाहकांनी आगाराकडे येणे बंद केले आहे. रविवारी दिवसभरात केवळ चार चालक आगारात आले होते. पण एकही बस रस्त्यावर येऊ शकली नाही. गेल्या काही वर्षांतील प्रदीर्घ कालावधीसाठी चाललेला हा संप आहे.