बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनसंदर्भात पुकारलेल्या संपात शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण मुंबईकरांचे हाल करण्याची इच्छा कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही. इतका अन्याय होऊनही कर्मचाऱ्यांनी कधी संप पुकारला नाही. आता मुंबईकरांनीही या कर्मचाऱ्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन करतानाच आता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यावर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन व सत्ताधारीच जबाबदार असतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

नवा वेतन करार आणि कनिष्ठ श्रेणीबाबतचा प्रश्न सोडवण्याच्या मुख्य मागणीसाठी बेस्टच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या ३७०० बस पाच दिवसांपासून आगारात उभ्या असून त्याचा फटका ५० लाखांहून अधिक प्रवाशांना बसत आहे. सलग पाचव्या दिवशी हा संप सुरु आहे. या संपात आता मनसेनेही उडी घेतली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शनिवारी वडाळा डेपो बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांना संबोधित करताना देशपांडे म्हणाले, संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत पण तुमच्या मनात मुंबईकरांचे हाल व्हावे अशी इच्छा नाही. इतका अन्याय होऊनही तुम्ही संप पुकारला नाही, आता मुंबईकरांनी बेस्टचा विचार करावा. आम्हाला मुंबईकरांना वेठीस धरायचे नाही, पण प्रशासन कामगारांना वेठीस धरणार असेल तर आमचा नाइलाज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाने आम्हाला वेठीस धरु नये, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आम्हाला घाबरवू नये, स्वत:च्या पायावर बाहेर पडायचे असेल तर आमच्या वाट्याला जाऊ नका, असा इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. बेस्ट कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी हा इशारा दिला.  सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यांवर तमाशाच होईल आणि यासाठी जबाबदारी प्रशासन व सत्ताधाऱ्यांची असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत शिवसेनेवरही निशाणा साधला. ‘आजवर मराठी मराठी म्हणून राजकारण केले, पण आता त्यांच्याच पोटावर ,त्यांच्याच आई बहिणीवर कारवाई करताय. लक्षात ठेवा तुम्ही फक्त ४० हजार कामगार तोडले नाहीत तर प्रत्येक कुटुंबात ५ ते ६ माणसं आहेत. आता विचार करा तुम्ही किती लोकांचा विश्वासघात केला’, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

बेस्ट समितीच्या १० ते १५ मुंडक्यासाठी ४० हजार कामगारांना वेठीस धरणारे तसेच मराठी माणसांच्या नावाने वर्षानूवर्षे राजकारण खेळणा-यांचे चांगलीच मुस्कटदाबी कामगारांच्या एकजुटीने केली आहे, असे त्यांनी सांगितले.