बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनसंदर्भात पुकारलेल्या संपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शनिवारी वडाळा डेपो बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि संपावर तोडगा काढण्याचा सरकारला इशारा दिला. अन्यथा सोमवारी तमाशा पाहायला तयार राहा असे ठणकावले आहे. आज रविवारी, संदीप देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत सरकारला संप मिटवा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा असे सांगितले आहे. आजचा बेस्ट संपाचा सातवा दिवस अजूनही सरकार कडून हालचाल नाही सरकारच नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही उद्या पासून नाक दाबायला सुरवात करणार सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती त्यांनी तयार राहावं आणि सरकारनी परिणाम भोगायला तयार राहावं असे संदीप देशपांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सरकारला इशारा दिला आहे.

बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण मुंबईकरांचे हाल करण्याची इच्छा कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही. इतका अन्याय होऊनही कर्मचाऱ्यांनी कधी संप पुकारला नाही. आता मुंबईकरांनीही या कर्मचाऱ्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन करतानाच आता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यावर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन व सत्ताधारीच जबाबदार असतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी दिला होता.

नवा वेतन करार आणि कनिष्ठ श्रेणीबाबतचा प्रश्न सोडवण्याच्या मुख्य मागणीसाठी बेस्टच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या ३७०० बस पाच दिवसांपासून आगारात उभ्या असून त्याचा फटका ५० लाखांहून अधिक प्रवाशांना बसत आहे. या संपात आता मनसेनेही उडी घेतली आहे.