बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी या संपावरुन आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेनेला लक्ष्य केले असून मराठी मराठी म्हणत मराठी माणसाला लुटलं, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

जवळपास नऊ दिवस बेस्टचा संप सुरु होता. संपावर तोडगा काढण्यात बेस्ट प्रशासन अपयशी ठरल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. त्या म्हणतात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (BKS) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. ह्याचा अनुभव गिरणी कामगारांना, खांबटा कामगारांना आणि आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आला. मराठी मराठी म्हणत मराठी माणसाला लुटले, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. सर्व कामगार संघटनांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, ७ जानेवारीपासून सुरू असलेल्या ‘बेस्ट’ संपामुळे लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. अखेर बुधवारी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला आणि नऊ दिवसांनंतर मुंबईतील रस्त्यांवर बेस्ट बस धावण्यासाठी सज्ज झाल्या. बेस्ट सुरु झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी हा संप हाताळण्यात शिवसेना सपशेल अपयशी ठरल्याची भावना प्रवासी व्यक्त करत आहे.