मुंबईकरांच्या अल्प प्रतिसादामुळे नव्हे तर वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे ‘बेस्ट’च्या सुमारे साठ टक्के बस गाडय़ा आगारात बंद अवस्थेत उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गारेगार सेवा देण्याचा बेस्टचा हा प्रयत्न उपक्रमासाठी मात्र भलताच गरम ठरत असल्याचा सूर शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत लावण्यात आला.

सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८४ वातानुकूलित बसपैकी अवघ्या १०९ बस गाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. केवळ प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बेस्ट प्रशासनावर वातानुकूलित बस गाडय़ा बंद करण्याची वेळ ओढावली असल्याची ओरड नेहमीच केली जाते. मात्र विविध कारणांमुळे तब्बल साठ टक्के वातानुकूलित गाडय़ा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. यात बेस्टच्या प्रवासी संख्येतही घट झाल्याने प्रशासनाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, प्रवाशांची कमी होणारी संख्या आणि तांत्रिक बिघाड यावर अभ्यास सुरू असून विविध उपाय समोर येत असल्याचे स्पष्टीकरण बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिले.