नोव्हेंबपर्यंत ३०० गाडय़ा सेवेत; प्रवाशांच्या गर्दीवर उपाय

मुंबई : प्रवाशांची वाढती संख्या पाहता बेस्टच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या ३०८ वातानुकूलित बस दाखल केल्या जाणार आहेत. या बस भाडेतत्त्वावरील आहेत. आठ बस येत्या १५ दिवसांत, तर ३०० बस नोव्हेंबरपासून टप्प्याटप्यात बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या अपुऱ्या पडणाऱ्या बसगाडय़ांमुळे प्रवाशांकडून त्यांची संख्या वाढवण्याचीही मागणी के ली जात आहे.

सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बस आहेत. यामध्ये बेस्टच्या स्वमालकीच्या ८९८ बसचे आयुर्मान संपत आल्याने पुढील वर्षांच्या मार्च महिन्यापर्यत त्या भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यातच भाडेतत्त्वावरील १,२०० मिनीबसपैकी फक्त ४६० बसच ताफ्यात आल्याने बेस्टचा गाडय़ांचा ताफा कमी होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर नियम पाळताना प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बसची संख्या वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून प्रयत्न होत आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यात बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी विजेवरील बस बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार प्रथम ३४६ बसचे नियोजन केले गेले. आतापर्यंत केवळ ३८ बस दाखल झाल्या होत्या. यामध्ये बेस्टच्या मालकीच्या सहा विनावातानुकूलित बस असून भाडेतत्त्वावरील वातानुकूलित ३२ मिडी बस आहेत. त्यानंतर आणखी आठ मिडी वातानुकूलित बस येत्या १५ दिवसांत दाखल होतील. तसेच १६० मिडी आणि १४० एकमजली मोठय़ा आकाराच्या बस येत्या नोव्हेंबरपासून दाखल होण्यास सुरुवात होईल. या ३०० बस वातानुकूलित आणि भाडेतत्त्वावर असतील. प्रत्येक एकमजली बसची किंमत दोन कोटी रुपये आणि मिडी बसची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे.

भाडेतत्त्वावरील १,२०० बसव्यतिरिक्त विजेवरील बस आल्यास बेस्टचा गाडय़ांचा ताफा आणखी वाढेल. बसची संख्या वाढल्यास प्रवाशांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल.