मुंबईच्या रस्त्यांवर ८ जून पासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार आहेत. मिशन बिगिन अगेन अर्थात पुनश्च हरीओम हा नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या अंतर्गत या बसेस सुरु करण्यात येणार आहेत. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला तेव्हापासून ही बससेवा बंद करण्यात आली होती. आता ८ जूनपासून मुंबईतल्या रस्त्यांवर बेस्ट बसेस धावताना दिसणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला जायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही बससेवा सोमवारपासून सुरु करतो आहोत असं बेस्टचे वरिष्ठ अधिकारी व्हिक्टर नागावकर यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आम्ही आमची सेवा सोमवारपासून सुरु करतो आहोत. ऑफिसला जाणारे कर्मचारी बेस्टने प्रवेश करु शकतात. त्यांना ओळखपत्र दाखवणे मात्र अनिवार्य असेल असंही स्पष्ट करण्यात आलं.

आत्तापर्यंत ७० बेस्ट बसेसचं रुपांतर अँब्युलन्समध्ये केलं आहे. करोनाच्या काळात रुग्णांची सोय व्हावी म्हणून हा निर्णय बेस्टने घेतला होता. मात्र मार्च महिन्यापासून या बसेस बंद होत्या. आता सोमवारपासून मुंबईतल्या रस्त्यांवर बेस्ट बसेस धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.