News Flash

‘बेस्ट’च्या प्रयोगांचे भोग!

रात्री नऊनंतर या मार्गावर डबल डेकर बससेवा बंद करून त्या जागी वातानुकूलित मिनी बससेवा सुरू करण्यात आली आहे.

|| सुशांत मोरे, सुहास जोशी, नीलेश अडसूळ, 

महसूलवाढीच्या उपाययोजनांचा प्रवाशांना मनस्ताप

मुंबई : तिकीटदरात कपात केल्यानंतर वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने सुरू केलेले प्रयोग प्रवाशांसाठी अधिक तापदायक ठरत आहेत. मिनी बस सेवा, ‘पॉइंट टू पॉइंट’ विनावाहक बस, डबलडेकरमध्ये एकच वाहक या प्रयोगांतून अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचतानाच महसुली खर्च कमी करण्याचा ‘बेस्ट’चा प्रयत्न आहे. मात्र, या सेवांच्या नियोजनातील गोंधळ प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

मिनी बस कधी फुल्ल कधी रिकामी

बेस्टने किमान भाडे पाच रुपये केल्यानंतर सीएमएमटी स्थानक ते एनसीपीए या मार्गावर प्रवासी शेअर टॅक्सीजच्या ऐवजी बसचाच वापर अधिक करू लागले होते. आता रात्री नऊनंतर या मार्गावर डबल डेकर बससेवा बंद करून त्या जागी वातानुकूलित मिनी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा चांगली असली तरी नियोजनातील गोंधळामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. रात्री नऊनंतर एनसीपीए येथून सुटणारी मिनी वातानुकूलित बस सुरुवातीच्याच थांब्यावर पूर्णपणे भरून जाते. त्यामुळे नंतरच्या थांब्यावरील बहुतांश प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. या बसची उंची आणि दोन आसनांमधील रांगेतील अरुंद अंतर यांमुळे उभ्याने प्रवास करणे कठीण बनते. दुसरे म्हणजे, काही वेळेत सुटणाऱ्या मिनी बस प्रवाशांनी तुडुंब भरून वाहत असल्या तरी, काही बसमध्ये मात्र तुरळक गर्दी दिसून येते.

डबल डेकरमध्येही एकच वाहक

मुंबईत धावणाऱ्या १२० डबल डेकरमध्ये खालच्या आणि वरच्या मजल्यावर प्रत्येकी एक वाहक असतात. आता खर्च वाचवण्यासाठी डबलडेकरमध्ये एकच वाहक नियुक्त करण्यात येत आहे. बस एखाद्या थांब्यावर आल्यावर तेथे अगोदरच उपलब्ध असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते आणि त्यानंतर बसमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र काही थांब्यावर वाहकच नसल्याचे समोर आले आहे. बेस्टच्या अहिल्याबाई होळकर चौक ते बॅकबे आगारापर्यंत धावणाऱ्या १३८ क्रमांकाच्या बसमध्ये ही त्रुटी हमखास दिसते. अनेकदा वरच्या मजल्यावर प्रवासी तिकीट काढण्यासाठी पैसे काढून बसले तरी वाहकाचा पत्ता नसतो.

चालक-वाहकांची तारांबळ

गर्दीच्या ठिकाणी गाडी चालविताना विनावाहक गाडीतील चालकाची चांगलीच तारांबळ उडते. दादर स्थानक (प.) ते प्रभादेवी, सिद्धिविनायक मंदिर आणि वरळी या मार्गावरील वरळी गाव (५६ क्र.) आणि प्रा. कुरणे चौक (११० क्र.) या विनावाहक गाडय़ांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी वाहक-चालकांचे मात्र हाल होत आहेत. विनावाहक गाडी असल्याने दादरच्या वाहतुकीच्या गर्दीत गाडी चालवणे, पुढे-मागे घेणे चालकासाठी जोखमीचे ठरते. अनेकदा बेस्टकडून बदली कर्मचारीही वेळेत पाठवला जात नाही. त्यामुळे वाहकांना जेवणाचीही फुरसत नसते.

वरळी ते दादर या दरम्यान गाडी केवळ वरळी नाका, प्रभादेवी आणि सिद्धिविनायक मंदिर या तीन ठिकाणी थांबते. याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचली नसल्याने काहींना मधेच उतरावे लागते. त्यामुळेही चालकासोबत वादावादी होते. ‘निर्णय जरी बेस्ट प्रशासनाचा असला तरी रोष मात्र कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रशासनाकडूनच वाहक-चालकांच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांमधील उत्साह मावळला आहे,’ असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

बेस्टच्या विनावाहक सेवेत वाहक व चालकाच्या कामाचा, त्यांच्या अडचणींचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्याप्रमाणे त्या सोडवल्याही जात आहेत. विनावाहक सेवेत प्रवाशांचीही गैरसोय होत असल्यास त्यांनी बेस्ट उपक्रमाला याची माहिती द्यावी. त्यांनी आपले अभिप्राय, सूचना कराव्या. याची दखल घेतली जाईल. यासाठी probestundertaking@gmail.com वर मेलही करावा किंवा जवळच्या बेस्ट आगाराशीही संपर्क साधावा. – मनोज वराडे, सहायक जनसंपर्क आधिकारी, बेस्ट उपक्रम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:11 am

Web Title: best transport mumbai best bus ticket akp 94
Next Stories
1 ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ : मुंबई विभागाची आज प्राथमिक फेरी
2 एनएसजी’ तुकडीचा लोकलप्रवास
3 पूर्वमुक्त मार्गावर ‘ताशी ८० किमी’ वेग!
Just Now!
X