यंदाच्या पावसाळ्यात बेस्टने आपल्या प्रवाशांवर जलाभिषेक करण्याचा संकल्प सोडला आहे का, अशी शंका येण्याइतक्या गळक्या बसगाडय़ा सध्या मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत. मात्र अवघा पावसाळा बस गळक्या राहिल्यानंतर आता पावसाळा सरता सरता बेस्टला गळती रोखण्याचे सुचले आहे. विशेष बेस्टने गळती शोधण्याच्या कामी वाहकांच जुंपले आह़े  त्यांच्या हाती खडू टेकवित बसमध्ये जेथून गळती होत, तेथे खडूने खूण करायचे अजब फर्मान सोडण्यात आले आहेत.
बेस्टच्या बसगाडय़ांमध्ये यंदा मोठय़ा प्रमाणात गळती झाल्याचे पाहायला मिळत आहे. गर्दीत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांपासून ते खिडकीत बसलेल्या प्रवाशांपर्यंत सगळ्यांवर बेस्ट जलाभिषेक करीत आहे. काही बसच्या छतामधून पाणी गळत असल्याच्या, तर काही बसच्या खिडक्या काही केल्या बंद होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्या होत्या. बेस्ट बसमधील गळती रोखण्यासाठी बेस्टने मे महिन्यातच एक परिपत्रक काढले होते. मात्र या परिपत्रकाकडे वाहकांनी त्या वेळी दुर्लक्ष केल्याचे बेस्टच्याच एका अधिकाऱ्याने सांगितले.
आता बेस्टने हे परिपत्रक नव्याने जाहीर केले आहे. या परिपत्रकातील सुचनेनुसार बस गळत असल्याची तक्रार एखाद्या प्रवाशाने वाहकाकडे केल्यास वाहकाने त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे. वाहकाकडे एक खडू देण्यात येणार असून या खडूने वाहकाने गळणाऱ्या ठिकाणी गोल खूण करणे अपेक्षित आहे. तसेच वाहकाने आपली कार्यवेळ संपताना त्याच्याकडील कार्डावर गळतीचे नेमके स्थान नमूद करायचे आहे. ही बस आगारात गेल्यानंतर त्या कार्डावर लिहिलेल्या ठिकाणची दुरुस्ती अभियंते करतील, असे सांगण्यात आले.

गळती कशामुळे?
बेस्ट बसेसची बांधणी भक्कम असून त्या सांगाडय़ातून कधीच गळती होत नाही. मात्र तयार झालेल्या बसमध्ये टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे किंवा उद्घोषक बसवण्यासाठी वायरिंग केले जाते. हे वायरिंग करताना बसच्या मूळ सांगाडय़ाला धक्का पोहोचतो आणि तो सांगाडा काही प्रमाणात खिळखिळा होतो. अनेकदा ही गळती त्याच्यामुळे होते. बऱ्याचदा झाडाच्या मोठय़ा फांदीचा फटका लागूनही बसच्या सांगाडय़ाला धक्का पोहोचतो आणि गळती होते. ही गळती टाळण्यासाठी सीसीटीव्ही, टीव्ही किंवा इतर काही बदल हा बस बांधणीच्या वेळीच केला गेला पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आह़े