कर्मचारी संख्येत तब्बल ४ हजारांची कपात; उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून नवीन भरती बंद केली आहे. त्यामुळे बेस्टची कर्मचारी संख्या ४ हजार १५१ ने घटली आहे. त्यातच बेस्टने मनुष्यबळ कपातीचा निर्णय नुकताच घेतल्याने बेस्टचे कर्मचारी धास्तावले आहेत. या निर्णयाने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतानाच कमी मनुष्यबळात बेस्टचे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चालक आणि वाहक पदांमध्येही घट झाली आहे.

बेस्टने आर्थिक डोलारा सावरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून काही आर्थिक सुधारणा सुचविल्या आहेत. त्यात भाडेवाढ, भाडेतत्त्वावर नवीन बस, बेस्ट आगारांत खासगी वाहनांकरिता पे अ‍ॅण्ड पार्क इत्यादी सूचनांचा समावेश आहे. मात्र याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी कर्मचाऱ्यांबाबतीतही जालीम उपाय सुचविले आहेत. मनुष्यबळात कपात करणे, महागाई भत्ता गोठविणे, भत्ते रद्द करण्यासारख्या सूचना सुचविल्याने बेस्ट उपक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

या उपाययोजना सुचविण्याआधीच बेस्ट उपक्रमाने तर नवीन भरती बंदच केल्याने उपक्रमात कर्मचाऱ्यांची वानवा होत आहे. २०१६ सालापासून बेस्टकडून नवीन भरती बंद करण्यात आली. यामुळे बेस्टला कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा भार सहन करावा लागत आहे. २०१६ पर्यंत बेस्ट उपक्रमाची एकूण कर्मचारी संख्या ४३ हजार ९७२ एवढी होती. २०१८ मध्ये ३९ हजार ८२१ पर्यंत कर्मचारी संख्या पोहोचली आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी चालक-वाहकांमध्ये चांगलीच घट झाली आहे. २०१६ मध्ये २३९७३ चालक-वाहक होते. हीच संख्या २०१८ पर्यंत २१ हजार १९५ पर्यंत आली आहे.

हे पाहिल्यास २ हजार ७७८ ने चालक-वाहकांची संख्या कमी झाली आहे. २०१६ सालापासून बेस्टने नवीन भरती न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर्मचारी कपात केली जाणार आहे. त्यामुळे बेस्टची ही वाटचाल खासगीकरणाकडे तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

बेस्टमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती बंद केली, ती फक्त खासगीकरण करण्यासाठीच. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सध्याच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. याचा परिणाम उपक्रमाच्या उत्पन्नावरही होतो. हे बेस्ट प्रशासनाला माहीत असूनही ते खासगीकरणासाठी नवीन भरती करत नाहीत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत कामही करावे लागते. काही दिवसांपूर्वी औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिला होता की, जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत मनुष्यबळ कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे सांगितले आहे. यामुळे थोडा दिलासा जरी मिळाला असला तरी बेस्टचे काही खरे नाही.

शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर्स युनियन