बोनस न मिळाल्याने संताप
सलग दुसऱ्या वर्षीही बोनसची बस चुकल्यामुळे संतप्त झालेल्या बेस्टच्या बसवाहक व चालकांनी ऐन दिवाळीत सोमवारी, भाऊबिजेच्या दिवशी सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्धार केला असल्याचे समजते. बेस्टचे कर्मचारी, फेरीवाले व रिक्षाचालकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत रान उठविण्याचा इशाराही कामगार नेते शरद राव यांनी दिला आहे.
बेस्ट समितीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी शरद राव यांनी महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांची भेट घेतली. बेस्टच्या २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात सानुग्रह अनुदानासाठी ७.२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे राव यांनी गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिले. ही रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून द्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली असून याबाबत ८ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असे राव यांनी सांगितले.
बोनसपासून वंचित राहावे लागल्याने संतापलेले वाहक व चालक भाऊबिजेच्या दिवशी सामूहिक रजेवर जाण्याच्या विचारात असल्याचे राव म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस देऊ नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना दिले आहेत.
बेस्ट समितीची बैठक संपल्यानंतर महाव्यवस्थापक तडक मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. यावरून सर्व काही स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.
उत्तर भारतात
काँग्रेसविरोधी प्रचार
काँग्रेस, भाजप, शिवसेनेविरुद्ध लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला जाणार असून काँग्रेसला धूळ चारण्यासाठी फेरीवाले आणि रिक्षाचालकांची पाच हजार जणांची फौज उत्तर भारतात पाठविण्यात येणार असल्याचे राव म्हणाले. राज्यातील परिवहन कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व परिवहन कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिवाळीनंतर एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी होळी अथवा उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान सर्व संघटना एकत्र येतील, असे राव यांनी सांगितले.