BEST STRIKE : बेस्ट कामागारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होत असताना पैसे कुठून आणायचे? असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. वडाळा डेपोत बेस्टच्या वर्कर्स युनियनच्या कामगारांना संबोधित करताना शशांक राव यांनी हा खुलासा केला. महापौर बंगल्यावर ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी बेस्टकडे पैसे नाहीत, ते कुठून आणायचे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारले होते याचा दाखला देत राव यांनी माननीय हायकोर्टामध्ये याचा फैसला झाला असून हा प्रश्नच राहिला नसल्याचे सांगितले. प्रत्येक कामगाराला किमान सात हजार रूपये वेतनवाढ मिळणार असून जानेवारीच्या पगारातच ही वाढ मिळेल असे त्यांनी सांगितले.

संपकाळामध्ये कोण कोण काय काय बोलत होतं हे सांगताना राव यांनी लिहून घ्या असा व्हॉट्स अॅप मेसेज फिरत होता याचा दाखला दिला. जे काही कोर्टात झालंय ते लिहिलं गेलंय असं सांगत अजिबात चिंता करू नका असा दिलासा त्यांनी दिला. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. याचा संदर्भ देताना राव यांनी लोक मला विचारायचे याचं काय करू, त्यावेळी मी सांगायचो फ्रेम करून ठेवा कारण तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकाल की ऐतिहासिक लढ्यात आम्ही सहभागी झालो होतो असं सांगितलं. हा संप मिटवण्याचा प्रयत्न झाला, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न झाला परंतु आपण सगळे एकजुटीनं राहिलो म्हणून संप यशस्वी झाल्याचे राव म्हणाले.

नऊ दिवसांच्या संपानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर व सन्मानजनकरीत्या मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचे राव यांनी जाहीर केले. हे सरकार जे काही आपल्याला देत होतं ते मृत्यूपत्र होतं अशा शब्दांत सरकारच्या कराराचं वर्णन करत राव यांनी सरकार काय देत होतं ते सांगितले. राव म्हणाले की,  “सरकारची अपेक्षा होती, की ते म्हणतील तसं आपण वागावं. ड्रायव्हरनं कंडक्टरचं काम करावं. कंडक्टरनं ड्रायव्हरचं काम करावं. पगारवाढीची मागणी करू नये. कंत्राटी पद्धतीनं हजारोलोक घेतले तरी मान्य करावं.” एकप्रकारे सगळी अरेरावी सहन करून त्यांना वाट्टेल तसं वागू द्यावं असं ते मृत्यूपत्र होतं जे आपण नाकारलेलं आहे असं राव यांनी सांगितलं.

२०१६च्या मार्चपासून आपण सांगत होतो करार करू… करार करू… परंतु आपल्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, असं राव यांनी सांगितलं. तसेच आता कोर्टामध्ये हे निश्चित झालं आहे की दीड महिन्यात नवीन करार करावा लागेल, कितीही साली लागलेला तात्पुरत्या प्रकारातला कर्मचारी असो त्याला किमान सात हजार वेतनवाढ द्यावी लागेल, मेडिकल, डीए, प्रवास भत्ता असे सगळ्या प्रकारचे लाभ हे द्यावे लागतील हे ही राव यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे जे काही नवीन कराराप्रमाणे मिळेल ते पूर्वलक्ष्यी प्रभावानं म्हणजे २०१६च्या मार्च महिन्यापासून मिळेल, पैसेही मिळतील असे ते म्हणाले. या संपामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात भरघोस पगारवाढ व सोयीसुविधा मिळत असल्याचे दिसत आहे. आता थोड्याच वेळात बेस्टच्या बसेस पुन्हा रस्त्यावर धावतील व संध्याकाळपर्यंत सेवा पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे.