19 January 2020

News Flash

‘ऑनलाइन गेम’आड सट्टेबाजार!

व्याप्ती सर्वसामान्य क्रिकेट रसिकांपर्यंत

|| जयेश शिरसाट

व्याप्ती सर्वसामान्य क्रिकेट रसिकांपर्यंत

गेमिंग अ‍ॅपआडून सुरू झालेली ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी घराघरात डोकावण्याच्या तयारीत आहे. कमीतकमी धोका पत्करून जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी बुकींनी विकसित केलेल्या या तंत्राने छंदी, सराईतांसह शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नोकरदारांना पछाडले आहे. विश्वचषकाच्या हंगामात ऑनलाइन सट्टेबाजीला ऊत येईल, असे पोलिसांचे निरीक्षण आहे.

दोन वर्षांपूर्वी भारतात निवडक बुकी (सट्टा घेणारे) आणि निवडक पंटर (सट्टा लावणारे) अस्तित्वात होते. हाती सहज खेळता पैसा असलेले छंदी फोनद्वारे बुकींकडे ‘खाया-लगाया’चा आवाज देत लाखो रुपयांचा सट्टा लावत. सट्टय़ाचा भाव सांगणारी ‘लाइन’ सामना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सतत सुरू असे. याच बुकींनी आता ऑनलाइन सट्टेबाजी सुरू करून सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनाही त्यात ओढण्याची धडपड सुरू केली आहे. ऑनलाइन गेम भासावा अशी सॉफ्टवेअर, अ‍ॅप तयार करून त्याचे वाटप सर्वत्र सुरू झाले आहे. ‘बीबीबी’, ‘मॅटाडोअर’, ‘स्काय’, ‘लकी’, ‘सीन्स’, ‘एलसी’, ‘एलसी एक्स्चेंज’, ‘ओशिअन ट्रॅक्स’ ही निवडक अ‍ॅप त्यातलीच. पंटरने हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे, बुकीकडून स्वतंत्र पासवर्ड, आयडी वापरून सट्टा लावायचा, असा खेळ सध्या सुरू झाला आहे. आयपीएलनंतर विश्वचषकाच्या हंगामात अशी अनेक अ‍ॅप सट्टेबाजारात अवतरतील, असे संकेत आहेत.

ऑनलाइन गेम आणि सट्टा हे दोन भिन्न प्रकार आहेत. मात्र काही ऑनलाइन गेममध्ये जिंकलेले पॉइंट्स, कॉइन्सबद्दल पैसे मिळवता येतात, असे महाराष्ट्र सायबरचे प्रमुख ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

बहुतांश अ‍ॅप, सॉफ्टवेअर परदेशात तयार होतात. प्रत्यक्ष व्यवहार होत नसल्याने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरच बुकींचे एजंट, छोटय़ा बुकींपर्यंतच करवाई मर्यादित राहते. त्यांना अटक झाली तरी त्यांनी वितरित केलेल्या पासवर्डआधारे सट्टेबाज, पंटर यांचा खेळ सुरूच राहतो, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सध्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असेल्या ‘टी-२० मुंबई’  मालिकेवरही सट्टा सुरू आहे. मालिकेतील प्रत्येक सामन्यावरील भाव ‘बेटफेअर’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहेत. अ‍ॅपद्वारे या मालिकेवर सट्टेबाजी सुरू आहे.

असा चालतो पडद्याआडचा ‘खेळ’..

स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेने केलेल्या कारवाया आणि सट्टेबाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन सट्टेबाजीत आर्थिक व्यवहार पडद्याआडून होतात. वरकरणी मोबाइलवर गेम खेळतो, असा भास होतो. सट्टा लावण्यासाठी पंटरच्या अ‍ॅप खात्यात पॉइंट्स, कॉइन्स असतात. ते बुकीला रोख रक्कम देऊन मिळवले जातात. आजचे सामने, हलता धावफलक अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. नाणेफेक कोण जिंकणार, जिंकल्यास फलंदाजी की गोलंदाजी, सामना कोण जिंकणार इथपासून पुढल्या चेंडूवर काय होणार इथपर्यंत सट्टय़ाचा भाव दिला जातो. खात्यावरील पॉइंट्स, कॉइन्सद्वारे सट्टा लावला जातो. हरल्यास पॉइंट्स वजा, जिंकल्यास वाढत जातात. त्याचा हिशेब खात्यावर दिसतो. पॉइंट्स संपल्यास ते पुन्हा रोख रक्कम देऊन विकत घ्यावे लागतात. किंवा बुकींकडून पाचपटीने पॉइंट्स उधार दिले जातात. यातून बाहेर पडताना हिशेबानुसार रक्कम पंटपर्यंत पोहोचवली जाते किंवा वसूल केली जाते.

नोकरदार, विद्यार्थी नादी..

मुख्य बुकी परदेशात आणि त्याचे दलाल (एजंट) प्रमुख शहरांमध्ये आहेत. हे दलाल अ‍ॅप, पासवर्ड वितरित करून पैसे गोळा करतात. हजार-दोन हजार रुपयांतही सट्टा लावता येतो. त्यामुळे बहुस्तरीय मार्केटिंगप्रमाणे ही अ‍ॅप सर्व स्तरात पोहोचत आहेत. श्रीमंत, छंदींसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसामान्य नोकरदारांच्या हाती ही अ‍ॅप दिसतात. ही माहिती आजवर झालेल्या कारवायांमधून पुढे आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on May 20, 2019 12:34 am

Web Title: betting in most popular games
Next Stories
1 कमला मिल अग्नितांडवप्रकरण : तिघे बडतर्फ, तिघांची पदावनती
2 रुग्णालये, प्रसूतिगृहे, आरोग्य केंद्रांची अग्निसुरक्षा तपासणी युद्धपातळीवर
3 स्वाइन फ्लूची लस घेण्याबाबत डॉक्टरच उदासीन
Just Now!
X