मुंबईत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवदगीताही शिकावी लागणार आहे. कारण मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे. फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे.

परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवदगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान सरकारच्या या निर्णयावर विद्यार्थी संघटनांसोबत विरोधकांनीही टीकेला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात धर्मनिरपेक्षता असायला हवी असं सांगत निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी महाविद्यालयात धार्मिक गोष्टी आणण्याची काही गरज नसल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आमचा भगवतगीतेला विरोध नाही मात्र ती महाविद्यालयात आणू नये असं आमचं म्हणणं आहे असं म्हटलंय. विनोद तावडे यांनी सतत बातम्यात राहण्याचा आपला प्रयत्न थांबवावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

कपिल पाटील यांनीदेखील निर्णयावर टीका करत संघीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. ‘जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत होत नव्हतं, पण आता इथेही सुरु होतंय. जर धर्माचा प्रसार करायचाच असेल तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत’, असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.