मंत्री-अधिकाऱ्यांत संतापाची लाट; कृषिमंत्र्यांचाही विरोध

असंवेदनशीलतेचे दर्शन घडवून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले वादग्रस्त सनदी अधिकारी भगवान सहाय यांच्यावरील कारवाईला २४ तास उलटत नाहीत तोच त्यांची पुन्हा त्याच खात्यात नियुक्ती करण्याचे लेखी आदेश राज्य सरकारने काढले आहेत. सरकारच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद मंत्री व अधिकाऱ्यांमध्ये उमटले आहेत. तर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सहाय यांच्या फेरनियुक्तीला विरोध दर्शवला आहे.

मुलाने आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यानंतरही कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांना घरी जाऊ देण्याची परवानगी अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) भगवान सहाय यांनी नाकारली होती. त्यानंतर घाडगे मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी गेले असता त्यांच्याकडे रजेच्या अर्जाबद्दल जाब विचारत सहाय यांनी असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले होते. त्यांच्या या कृतीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने सहाय यांना सक्तीच्या विश्रांतीवर पाठवत असल्याचे जाहीर केले. मात्र, नंतर सहाय यांना १२ दिवसांच्या सुट्टीवर पाठवण्यात आले. परंतु सुट्टीवरून परतल्यावर सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केले जाईल, असा लेखी आदेशच शनिवारी सरकारने काढला.  सहाय यांच्यावर सरकारची एवढी कृपादृष्टी का, असा सवाल व्यक्त केला जाऊ लागला. सहाय यांना प्रशासनातील वरिष्ठही बिचकून असतात, असे बोलले जाते. सहाय यांची फेरनियुक्ती झाल्यास ते त्यांच्या विक्षिप्त स्वभावाप्रमाणे त्रास देतील याचा अंदाज आल्याने कृषी खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी संतप्त झाले. सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नेमल्यास आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

 

आमचीही सुटका करा

सहाय यांच्यावर कारवाई झाल्याने आमची सुटका होईल, या आशेवर अन्य खात्यातील कर्मचारी आहेत. महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागत असल्याने हैराण झाले आहेत. नवी मुंबई महापालिकेत शिंदे नावाच्या अधिकाऱ्याने तर सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळी काम देत खात्यातील महिलांसह सर्व कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत थांबण्यास भाग पाडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या साऱ्या तक्रारींची मुख्य सचिवांनी दखल घेतली आहे.

सहाय यांच्या फेरनियुक्तीच्या आदेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. सहाय यांची कृषी खात्यात पुन्हा नियुक्ती होणार नाही, याचा मला विश्वास आहे.

– पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री