विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न केले असले तरी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. याऐवजी विद्यमान आमदार भाई जगताप यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली.
विधान परिषद निवडणुकीकरिता उमेदवारीसाठी नारायण राणे इच्छुक होते. कुडाळ आणि वांद्रे पूर्व या दोन मतदारसंघांमधील लागोपाठ पराभवांमुळे राणे यांना किती वेळा संधी द्यायची, असा प्रश्न पक्षात उपस्थित करण्यात आला होता. पक्षाच्या उमेदवारांची नावे ही उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मान्यतेने निश्चित करण्यात आली आहेत. पक्षाचे अ. भा. सरचिटणीस गुरुदास कामत तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राणे यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेसुद्धा फारसे आग्रही नव्हते. यातून राणे यांच्या नावाचा विचार झाला नाही. पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यावर भाई जगताप यांनी अर्ज दाखल केला. तेव्हा कामत आणि निरुपम हे उपस्थित होते.
जुलै महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारीकरिता राणे यांचा प्रयत्न राहील, अशी शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये माजी राज्यमंत्री बंटी पाटील यांनी उमेदवारीकरिता दावा केला असला तरी स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाला होणारा विरोध लक्षात घेता पक्षाने घाईघाईत निर्णय घेण्याचे टाळले. विद्यमान आमदार महादेव महाडिक यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला आहे. धुळे-नंदुरबारमध्ये माजी मंत्री व शिक्षणसम्राट अमरीश पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

‘उमेदवारी मागितली नव्हती’
विधान परिषदेकरिता आपण उमेदवारी मागितलीच नव्हती, असा दावा राणे यांनी केला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट झाली तेव्हा त्यांनीच विधान परिषद निवडणुकीचा विषय उपस्थित केला होता. निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आपण केली होती, असे राणे यांनी सांगितले.

मनसेचा पाठिंबा भाजपला?
मुंबईतील दोन जागांपैकी शिवसेनेचे रामदास कदम यांच्या विजयात काहीच अडचण येणार नाही. कारण पहिल्या पसंतीची ७५ मते आवश्यक असून, शिवसेनेकडे तेवढे संख्याबळ आहे. दुसऱ्या जागेकरिताच लढत आहे. काँग्रेस (५३), राष्ट्रवादी (१४) असे संख्याबळ ६७ होते. काँग्रेसच्या जगताप यांना आठ मते कमी पडत आहेत. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. मनसेची २८ मते निर्णायक आहेत. काँग्रेसकडून राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता मनसेकडून पाठिंब्यासाठी नकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. भाजपने मनसेकडे पाठिंब्याकरिता हात पसरले आहेत. भाजपची ३२, मनसेचा पाठिंबा मिळाल्यास २८ अशी ६० मते होतात; तरीही आणखी १५ मतांची बेगमी करावी लागेल. यामुळेच मोठय़ा प्रमाणावर घोडेबाजार होऊन जास्त खर्च करेल त्याला यश मिळू शकेल.