सियाराम कंपनीच्या जाहिरातीच्या माध्यमातून भय्यू महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख हे दूरदर्शनच्या पडद्यावर आले. पुढे ते अध्यात्माकडे वळले. अध्यात्मात स्थिरस्थावर झाल्यावर त्यांचा राजकीय क्षेत्रात दबदबा वाढला. मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, विविध राजकीय नेते त्यांच्या दरबारात हजेरी लावू लागले आणि भय्यू महाराजांचे महत्त्व वाढले.

राज्याच्या राजकारणात भय्यू महाराज हे एक बडे प्रस्थ होते. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे साऱ्याच राजकीय पक्षांचे बडे नेते भय्यू महाराजांच्या दरबारात हजेरी लावत असत. राजकीय नेते येऊ लागल्यावर नोकरशहा, उद्योगपती, ठेकेदार यांचीही रेलचेल वाढली. आपापली कामे करून घेण्याकरिता ते महाराजांच्या चरणी ‘लिन’ होऊ लागले. काही नोकरशहा चांगल्या पदावर नियुक्ती मिळावी म्हणून महाराजांच्या दरबारात जात असत. निवडणुकीत पक्षाची उमेदवारीही भय्यू महाराजांमुळे मिळते, असा संदेश गेल्याने निवडणुकीच्या हंगामात इच्छुक मंडळींची गर्दी होत असे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराजांचे शिष्य होते. राज ठाकरे यांच्यापासून अनेक नेत्यांचे महाराजांचे घनिष्ठ संबंध होते. भय्यू महाराजांच्या सल्ल्याने राजकीय मंडळी आपली राजकीय निर्णय घेत असत.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण मिटविण्याकरिता तत्कालीन राज्यकर्त्यांनी भय्यू देशमुख यांची मदत घेतली होती. अर्थात त्याला यश आले नव्हते. दोन वर्षांपूर्वी कोपर्डीच्या दुर्घटनेनंतर राज्यात मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीयदृष्टय़ा अडचणीत आले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी म्हणे भय्यू महाराजांची मदत घेतली होती. त्याच काळात शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून मराठा समाजाने शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली होती. हा रोष शमविण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची दिलगिरी व्यक्त करावी म्हणून भय्यू महाराज यांनी मध्यस्थी केली होती.