‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम फेरीचा जल्लोष; नाटय़प्रेमी रसिकांचा उदंड प्रतिसाद
तरुणाईची सर्जनशीलता, कलात्मकता आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडवणाऱ्या, महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी प्रचंड उत्साह आणि उदंड प्रतिसादात पार पडली. मनोरंजनाची आणि संवादाची अत्याधुनिक माध्यमे सतत बदलत असताना नाटकासारखी महाराष्ट्राची पारंपरिक कला आजच्या तरुणांच्या हाती सुरक्षित आहे याचा प्रत्यय ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या अंतिम सोहळय़ात आला. राज्यातील आठ विभागांमधील सवरेत्कृष्ट एकांकिकांच्या झालेल्या उत्कंठावर्धक महाअंतिम लढतीत अखेर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भक्षक ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली. यावेळी स्पर्धकांना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने शनिवारी रवींद्र नाटय़गृहात पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहाय्य लाभले आहे. या स्पध्रेला ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रावर होत आहे. या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून होते. तर ही स्पर्धा पॉवर्ड बाय केसरी आहे.
स्पध्रेत अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते अत्याधुनिक संवादमाध्यम ‘व्हॉट्सअ‍ॅप’पर्यंतच्या विषयांचा समावेश होता. राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अहमदनगर या केंद्रांवर पार पडलेल्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये तब्बल १३० एकांकिका सादर झाल्या होत्या. यातील सवरेत्कृष्ट आठ एकांकिका महाअंतिमफेरीत दाखल झाल्या होत्या. वन्यजीव-मानव संघर्षांवर आधारीत औरंगाबादच्या भक्षक एकांकिकेने अंतिम फेरीची सुरुवात झाली. यानंतर अपयशातून यशाचा मार्ग दाखविणारी अहमदनगरची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका सादर झाली. नक्षलवादापेक्षा मानवता ही किती महत्त्वाची आहे हे सांगितले ठाण्याच्या ‘मित्तर’ या एकांकिकेने. तर आधुनिक संवाद माध्यमांमुळे जडणारी नाती आणि बिघडणारा संवाद सादर केला तो नाशिकच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या एकांकिकेने. रत्नागिरीच्या ‘भोग’ या एकांकिकेतून अंधश्रद्धा निमूर्लनावर प्रकाश टाकण्यात आला तर स्त्री सक्षमीकरणाचा पट प्रकाशयोजनेतून वेगळय़ा सादरीकरणाने नागपूरच्या ‘विश्वनटी’ या एकांकिने सर्वाचे लक्ष वेधले. यानंतर मुंबईच्या ‘एक्स-प्रीमेंट’ या एकांकिकेने लुई पाश्चरच्या संशोधनाचा प्रवास दाखविण्यात आला. तर पुण्याच्या ‘जार ऑफ एल्पिस’ या एकांकिकेतून आशावादावर प्रकाशझोत टाकण्यात आला. महाअंतिम फेरीसाठी अभिराम भडकमकर, आनंद इंगळे, राजन भिसे, परेश मोकाशी, प्रतीक्षा लोणकर यांनी परीक्षण केले.
स्पर्धकांचा उत्साह, मान्यवर परीक्षक आणि नाटय़क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले. तर या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांची उपस्थितीही तितकीच लक्षणीय होती. एकांकिकांमधील संवादफेक, कसदार अभिनय याला प्रेक्षकांकडून वेळोवेळी दाद मिळत होती. यामुळे नाटय़गृहातील वातावरण नाटय़मय झाले होते. अनोखा नाटय़ाविष्कार पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी एकांकिकांना दाद देऊन नवतरुणांना प्रोत्साहन दिले.
या स्पध्रेत तरुणांच्या सृजनशील शक्तीचे दर्शन घडले. विषयांच्या खोलवर जाण्यासाठी केलेला विचार आणि ते सादर करण्याचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य होता. – शैलेश पेंढारकर

अनेक वेगवेळय़ा कल्पना आणि प्रयोग त्याचप्रमाणे मांडणी लोकांकिका स्पध्रेचे वैशिष्ठय़ मानले गेले पाहीजे. तरुणांनी सादर केलेले लेखन आणि दर्जेदार अभिनय हे सरस ठरले. – संतोष सावंत

तरुणांसाठी ही स्पर्धा म्हणजे उत्तम व्यासपीठ आहे. या स्पध्रेत प्रचंड उर्जा जाणवली. आजचे तरूण इतके वेगवेगळे विचार मांडतात हा अनुभव थक्क करणारा आहे. – प्रीतम धामणसकर

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा उत्तम झाली. काळाशी सुसंगत विषय निवडून केलेले सादरीकरण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले हे मोठे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे संधीत रुपांतर करावे. – अनुराधा बगेकर

एकांकिकेचे तंत्र चकाचक झाले असले तरी आशयावर अजून मेहनत घेणे आवश्यक आहे. दूरदर्शनवरील मालिका किंवा चित्रपटाकडे जाण्यासाठी एकांकिका स्पध्रेचा पायरीचा दगड म्हणून वापर करू नका. किमान काही वर्षे तरी एकांकिका नाटक गांभीर्याने करा.
– राजन भिसे, परीक्षक

भाषाशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एकांकिकांमधून विविध विषय हाताळले गेले पाहिजेत. तसेच त्यावर अधिक सखोलपणे विचार करणे आवश्यक आहे.
– आनंद इंगळे, परीक्षक

सगळय़ांचा कल प्रबोधनाकडेच आहे. मात्र, जगण्यातला एखादा रसरशीत अनुभवही महत्त्वाचा असतो. त्याची माहिती त्यातून व्हायला हवी होती.
– प्रतीक्षा लोणकर, परीक्षक

एकांकिका सादरीकरणाच्या विविध शैली असून ती प्रत्येक शैली सादरीकरणात येणे आवश्यक आहे. एकांकिका करत असताना जे करतोय ते जमलेच नाही असे समजून पुढे व्हा.
– परेश मोकाशी, परीक्षक

आपली एकांकिका सादर झाल्यानंतर त्याकडे तटस्थपणे बघा त्या कलाकृतीने आपल्याला आनंद दिला का असा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारा.
– अभिराम भडकमकर, परीक्षक

’मागच्या वर्षीपासून ‘लोकसत्ता लोकांकिका’ पाहतेय. येथील ऊर्जा आणि रंगभूमीवर धडपड करणारी वृत्ती आवडली. महाविद्यालयांमध्ये केलेले ते दिवस आठवले.
– मधुगंधा कुलकर्णी,
अभिनेत्री-लेखिका
’एकांकिका पाहण्यासाठी झालेली गर्दी पाहून भारावून गेलो. येथे उपस्थित मुलांमध्ये प्रचंड उर्जा होती.
– संजय मोने, अभिनेते

’मागच्या वर्षी या स्पध्रेत सहभाग घेतला होता. त्यावेळी केलेली मेहनत यावेळी फळाला आली. विभागीय अंतिम फेरीमध्ये दिग्दर्शक आणि अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. आज त्याचा राज्य पातळीवर शिक्कामोर्तब झाला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ म्हणजे नाटके कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहे.
– रावसाहेब गजमल,
सवरेत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक, सवरेत्कृष्ट एकांकिका.

’‘ड्रायव्हर’ या एकांकिकेमध्ये
रमाची छोटीशी भूमिका होती त्यामुळे सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, आता पुरस्कार मिळाल्याचा आनंद वाटतोय.
– गौरी मार्डीकर,
सवरेत्कृष्ट अभिनेत्री
पारितोषिकाचे स्वरूप

सर्वोत्कृष्ट लोकांकिका – रु. २५ हजार
द्वितीय लोकांकिका – रु. १५ हजार
तृतीय लोकांकिका – रु. १० हजार

(विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्हही प्रदान करण्यात आले)
तिसरे पारितोषिक

मुंबईच्या डहाणूकर महाविद्यालयाची ‘एक्स-प्रीमेंट’ ही एकांकिका तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते या एकांकिकेतील कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
दुसरे पारितोषिक

अहमदनरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. या एकांकिकेतील कलाकारांना परीक्षक परेश मोकाशी, प्रतीक्षा लोणकर व सॉफ्ट कॉर्नरचे डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
संपूर्ण निकाल

दिग्दर्शन (विनय आपटे स्मृती पारितोषिक) : रावबा गजमल, ‘भक्षक’, डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद<br />लेखन : आदिल नूर शेख, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक
संगीत : भरत जाधव आणि अनिल बडे, ‘भक्षक’, डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
प्रकाश योजना : वैदेही चवरे, ‘विश्वनटी’, डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय, नागपूर<br />नेपथ्य : आश्लेषा कुलकर्णी, ‘ड्रायव्हर’, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर.