‘कोसला’ ते ‘हिंदू’ हे भालचंद्र नेमाडे यांचे ग्रंथ, वि. स. खांडेकर यांची ‘ययाती’सह कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांचा साहित्यप्रवास साहित्य, चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील दिग्गज मंडळी उलगडून दाखविणार आहेत. निमित्त आहे, भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचा.. या निमित्ताने येत्या सात मे रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे ‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा’ हा आगळा वेगळा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केला आहे. कायम ठोकळेबाज कार्यक्रम करणाऱ्या सांस्कृतिक विभागाने कात टाकल्याचे या निमित्ताने दिसून येत असून गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी सात वाजता ‘अभिमान अभिनंदन आणि आनंद सोहळ्या’त फय्याज, श्रीधर फडके, पद्मजा फेणाणी, आशा खाडीलकर, नंदन उमप, तुषार दळवी, मुग्धा वैशंपायन, रीमा लागू, वंदना गुप्ते आदी दिग्गज ज्ञानपीठ विजेत्यांचा प्रवास उलगडून दाखविणार आहेत.