संस्कृती शिखरावर नाही तर तळात घडते. गाळात उगवते. शिखरावर बर्फ असतो, ऑक्सिजन नसतो. ही संस्कृती घडविणारा शिक्षक असल्याचा अभिमान मला लेखक असण्यापेक्षाही अधिक वाटतो, असे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.
‘रवींद्र नाटय़ मंदिर’ येथे झालेल्या ‘शिक्षण साहित्य संमेलना’त ते बोलत होते. लोकशाहीर संभाजी भगत या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘निशाणा डावा अंगठा’चे लेखक आणि गेल्या वेळच्या संमेलनाचे अध्यक्ष रमेश इंगळे-उत्रादकर, प्रख्यात अभिनेत्री आणि गायिका फैयाज, कवी अरुण म्हात्रे, समीक्षक म. सु. पाटील, आमदार कपिल पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘शिक्षकांना सन्मान मिळत नाही, अशा समाजात राहण्याची मला लाज वाटते. पण, या परिस्थितीत शिक्षकांनी कणखरपणे आपले काम करत राहिले पाहिजे. शिक्षकच बदल घडवू शकतो, यावर माझा विश्वास आहे. शिक्षकांनी पाठय़पुस्तकांच्या पलीकडे जाऊन मुलांना संस्कृती, इतिहास शिकवावा. तसेच, वर्गातील गरीब घरातील मुलांकडे अधिक लक्ष द्यावे. कारण, हीच मुले पुढे जात असतात,’ असा सल्ला त्यांनी उपस्थित शिक्षक साहित्यिकांना दिला. ‘मराठी संस्कृतोद्भव नसून ती स्वतंत्र प्राचीन भाषा आहे. तिचे खास मराठी शब्द संस्कृतात शोधूनही सापडत नाहीत,’ असे मराठीचे स्वतंत्र महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले.
गुरू म्हणजे ‘बदल’ -जावेद अख्तर
‘आपल्या सभोवताली विषमता मोठय़ा प्रमाणावर वाढत असून गुन्हेगारी, हिंसा यांचे प्रमाणही वाढते आहे. अशा परिस्थितीत शिक्षकच समाजाला चांगली दिशा दाखविण्याचे काम करून बदल घडवून आणू शकतील. म्हणून मला फक्त शिक्षकांकडूनच अपेक्षा आहे,’ असे प्रतिपादन समारोपप्रसंगी प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केले.