भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी भाजपा आणि शिवसेनेवर घणाघाती शब्दांत टीका केला. काँग्रेसने शिवसेनेशिवाय मुंबई १०० टक्के बंद यशस्वी केल्याचा दावा निरूपम यांनी केला. इंधन दरवाढीबाबत भाजपा जितकी जबाबदार आहे. तितकीच शिवसेनाही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईच्या व्यापारांनी बंदला पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवल्यामुळे  निरूपम यांनी त्यांचे आभार मानले. शिवसेना नेहमी सरकारच्या धोरणाविरोधात बोलण्याचे नाटक करते. ते जनतेच्या भावनेशी खेळतात. परंतु, त्यांच्या आजच्या भूमिकेमुळे पर्दाफाश झाला आहे. बंद १०० टक्के यशस्वी झाला. इतकेच काय शिवसेना भवनाखालील दुकानेही बंद होती, अशी माहिती निरूपम यांनी यावेळी दिली. शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा दिला नव्हता. विरोधक अयशस्वी ठरल्यानंतर शिवसेना आंदोलन करेल असे, सेनेने रविवारी म्हटले होते.

इंधनाचे दर निश्चित करणे सरकारच्या हातात आहे. परंतु, त्यांनी करांमध्ये भरमसाठी वाढ करून ठेवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे, असे निरूपम म्हणाले.