चेंबूरच्या माहुल गाव परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या एका प्रकल्पामध्ये वर्षभरापूर्वी भीषण स्फोट झाला होता. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. तर या स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र घटनेला वर्ष उलटून गेले तरी येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीत मागच्या वर्षी ८ ऑगस्टला भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा कंपनीला लागून असलेल्या माहुल गाव, गव्हाण गाव, आंबा पाडा, साईनाथ नगर आणि पालिका वसाहत या रहिवाशांना सर्वाधिक फटका बसला होता. स्फोटाच्या तीव्रतेमुळे येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. तर अनेकांच्या टीव्ही आणि खिडकीच्या काचादेखील फुटल्या आहेत.

या घटनेनंतर नुकसान झालेल्या रहिवाशांना कंपनीने तत्काळ मदत करावी अशी मागणी करत शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा या कंपनीवर काढण्यात आला होता. मात्र तरीही रहिवाशांना कुठल्या प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही.