डॉ.सी.व्ही. रामन यांनी शोधलेल्या रामन इफेक्टसला २८ फेब्रुवारी १९२८ रोजी मूर्त स्वरूप प्राप्त झाले. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव  यांनी खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी मांडलेले विचार..
भारत हा विज्ञान संशोधनात मागे आहे अशी ओरड सातत्याने होत असते. पण संशोधनासाठी दिले जाणारे प्रोत्साहन आजही तोकडे वाटते. यामुळे विज्ञान संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक आणि मनुष्यबळ निर्माण झाले पाहिजे. याचबरोबर भारतीय वैज्ञानिकांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे, इतकेच नव्हे तर त्यांनी अचूक प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. तसे झाले तर आपण खूप वेगाने प्रगती करू शकू. सरकार यासाठी काय करते याहीपेक्षा खासगी कंपन्या यासाठी काय करतात हेही आपण पाहिले पाहिजे. कोणत्याही संशोधनाचा सर्वाधिक फायदा हा खासगी कंपन्यांना होत असतो. यामुळे त्यांनी संशोधनात अधिकाधिक गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. संशोधनाला आर्थिक पाठबळ मिळेल आणि संशोधने आर्थिक अडचणीत न सापडता वेळेवर पूर्ण होतील.
सध्या देशात विज्ञान संशोधनात अनेक चांगली कामगिरी होत आहे असा अनेकांचा समज आहे. पण प्रत्यक्षात चित्र तसे नाही. जगातील एकूण संशोधनापकी आपण केवळ तीन टक्केच संशोधन करत आहोत. याउलट चीनचा वाटा हा १२ ते १४ टक्के इतका आहे. यावरून आपण संशोधन क्षेत्रात खूप काही करण्याची गरज आहे, हे स्पष्टच आहे. आपण संख्येपेक्षा दर्जाला महत्त्व देण्याची गरज आहे. वर्षांला इतके हजार प्रबंध सादर झाले याहीपेक्षा त्याचा दर्जा महत्त्वाचा आहे. कारण दर्जाच्या बाबतीत भारतीय संशोधने प्रगत देशांच्या तुलनेत खूपच कमी असतो. जगभरातील संशोधनाच्या दर्जाच्या बाबतीत विचार केला असता असे दिसून येते की चांगल्या दर्जाच्या पहिल्या संशोधनामध्ये भारतातील संशोधन हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात. सध्या भारतात मोठय़ा प्रमाणावर संशोधन संस्थांची स्थापना करण्यात येत आहे. या संस्थांमध्ये अशा प्रकारचे दर्जात्मक काम व्हावे अशी अपेक्षा आहे.