थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्यात यावी अशी राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे शिफारस करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात ते बोलत होते.

वरळी येथे आयोजित ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर लवकरच ओबीसी महामंडळाला ५०० कोटींचा निधी देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

दरम्यान, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. महात्मा जोतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये विधानसभेत दिले होते. माणसामाणसात भेदभाव निर्माण करणाऱ्या जातिव्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा, अशी मागणी विधानसभेत  करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला तशी शिफारस करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देखील जानेवारी २०१५ मध्ये महात्मा जोतिबा फुले आणि काशीराम यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मार्च महिन्यात लोकसभेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी १८४८ साली मुलींची शाळा सुरु केली होती. सावित्रीबाई फुले त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या. या दोघांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेला झुगारुन हे क्रांतीकारक पाऊल उचलले. स्त्री-पुरुष समानतेचा पाया त्यांनी घातला, असे सुळेंनी म्हटले होते. दलित, शोषित, महिला आणि शेतकरी यांच्या भल्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा, यासाठी पक्षभेद विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले होते.