लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरु असून आज अजून दोन नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार आणि काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

यानिमित्ताने काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा स्वगृही परतले आहेत. प्रकाश मेहता यांच्यासोबत झालेल्या वादानंतर 2012 मध्ये प्रवीण छेडा यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2012 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहतांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार असणाऱ्या पराग शाह यांनी प्रवीण छेडा यांचा पराभव केला. दरम्यान प्रकाश मेहता यांना शह देण्यासाठीच प्रवीण छेडा यांना भाजपात घेतलं असल्याचं बोललं जात आहे.