भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते नागरिकांना रोकडविरहित व्यवहारांचे प्रशिक्षण देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५००-१००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते नागरिकांना रोकडविरहित व्यवहाराचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिली. मुंबईतील अनेक व्यवहार मात्र, रोखीने होत असल्याने या प्रशिक्षणाचा काही फायदा होईल का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मुंबईतील एटीएम आणि बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा दिसत होत्या. अनेकांना ऑनलाइन व्यवहार कसा करावा याची माहिती नसल्याने त्या व्यवहाराचे प्रशिक्षण भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते देणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. दादर येथे राबविलेल्या ‘मन की बात चाय के साथ’ या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

[jwplayer 1G6YlsuX]

मुंबईतील नागरिकांना मोदी यांचे भाषण ऐकता यावे, म्हणून भाजपतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

एक खास बनावटीची छत्री, बसण्यासाठी आसने, भाषण ऐकण्यासाठी ध्वनिक्षेपक आणि सोबत चहा अशा स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई व उपनगरातील ३२८ ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे बँकांसमोरील रांगा तर कमी होतीलच परंतु त्याचबरोबर रोकडविरहीत व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही शेलार यावेळी म्हणाले. या उपक्रमात नागरिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. तसेच, या प्रशिक्षणामुळे घर बसल्या सर्व व्यवहार करणे कसे सोपे होईल, हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई काँग्रेसतर्फे जनआक्रोश मोर्चा

मुंबई : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता सांताक्रूझ पूर्व येथील डॉ. आंबेडकर चौक, सीएसटी रस्ता, कालिना ते वांद्रे खेरवाडी जंक्शन असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून काही विरोधी पक्षांनी भारत बंदच्या आयोजनाची हाक दिली आहे. मात्र काँग्रेसने भारत बंदमध्ये सहभागी न होता मोर्चा काढून विरोध करण्याचे ठरवले आहे.

‘नोट पे चर्चा’ या आंदोलनानंतर काँग्रेसने मुंबईत जन-आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पािठबा दर्शविल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला असून तसेच धारावी, कालिना, सांताक्रूझ पूर्व व पश्चिम, कुर्ला, वांद्रे या विभागांतील फेरीवाले व दुकानदार, व्यापारी यांनी या मोर्चाला पािठबा दिला आहे.

त्याचबरोबर फेडरेशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, मुंबई गोल्ड होलसेल असोसिएशन, मुंबई काँग्रेस टॅक्सी-रिक्षा युनियन, मुंबई काँग्रेस वाहतूक संघटना, बेस्ट एम्प्लॉईज युनियन आणि स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियन या संघटना सदर जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

[jwplayer UyWFIua2]