भायखळा येथील राणीबागेच्या आवारात असलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा विस्तार करताना बाजूच्या मैदानावर कार पार्किंगसाठी जागा देण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. दक्षिण मुंबईत मोकळ्या जागांची कमतरता असताना एका खासगी संस्थेला विकासासाठी एवढी जागा देण्याची गरज नाही, असा पवित्रा घेत मनसेने रविवारी निदर्शने केली.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाची जागा, वस्तू पालिकेच्या मालकीच्या असल्या तरी जमनालाल बजाज फाऊंडेशन या खासगी संस्थेकडून या संग्रहालयाची देखभाल केली जाते. आता या वास्तूच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव पालिकेसमोर आहे. त्यात संग्रहालयाशेजारच्या मोकळ्या मैदानावर कार पार्किंगची योजना आहे. त्याच वेळी सध्या संग्रहालयाकडे असलेल्या मोकळ्या जागेत कॅफेटेरिया दाखवण्यात आला आहे. खासगी संस्थेला कॅफेटेरिया देऊन स्थानिक मुलांची खेळण्याची जागा गिळंकृत करण्याचा हा डाव असल्याचा आरोप मनसेने पालिकेकडेही केला आहे. या संदर्भात जनमत तयार करण्यासाठी आणि विरोधाची धार वाढवण्यासाठी मनसेच्या स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी राणीबागेच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करण्यात आली.