मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना शहरी नक्षल ठरवले होते, असे सांगत भीमा-कोरेगाव दंगल व यल्गार परिषदेबाबत पोलिसांनी केलेल्या तपासाचा बुधवारी सकाळी आढावा घेणार असून चौकशीचे तपशील समजावून घेऊन याबाबत विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

मागच्या सरकारच्या काळात शहरी नक्षल हा विषय सुरक्षेच्या दृष्टीने ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर याबाबत भूमिका काय आहे असे देशमुख यांना विचारले असता, सरकारच्या विरोधात कोणी बोलले तर त्यांना शहरी नक्षल ठरवण्याची फडणवीस सरकारची पद्धत होती. मागच्या सरकारने विरोधकांची मुस्कटदाबी केली, पण आम्ही ती करणार नाही. लोकशाहीत सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीत विविध क्षेत्रातील बुद्धिवंतांना नक्षलवादाशी संबंधित असल्यावरून गोवण्यात आले, असा आरोप आहे. बुधवारी या प्रकरणाचा पोलिसांनी केलेल्या तपासाचा आढावा घेणार आहे. त्यासाठीचे सादरीकरण करण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित असतील. या प्रकरणात विशेष तपास पथक नेमण्याची मागणीही होत आहे.

या दंगलीच्या चौकशीसाठी मागील सरकारने आयोगही नेमण्यात आला होता. मात्र, अद्याप काम संपलेले नाही. मुदतवाढीची मागणी होत आहे. त्यामुळे तपासाचा आढावा घेतल्यानंतर विशेष तपास पथक नेमण्याबाबत निर्णय होईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

मुंबईतील रात्रजीवनाला मान्यता

मुंबईत रात्रजीवन सुरू करण्याबाबतचा निर्णय थेट जाहीर करण्यापूर्वी मंत्रिमंडळात चर्चेला आला असता तर त्यास फाटे फुटले नसते, असे सूचक विधान देशमुख यांनी केले. मुंबईत काही भागांत रात्रजीवन सुरू करण्याबाबत बुधवारी मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. संपूर्ण मुंबईत रात्रजीवन सुरू करण्यास पूर्वीच पोलीस अधिकाऱ्यांनी विरोध केला होता.

आधीच पोलिसांवर खूप ताण असताना मुंबईभर रात्रजीवन सुरू केल्यास पोलीस यंत्रणा सुरक्षेची व्यवस्था करण्यास अपुरी ठरेल, असा मुद्दा होता. मात्र, सध्या मुंबईत बिगर निवासी अशा वांद्रे-कुर्ला संकुल, गिरण्यांच्या जमिनीवरील मॉल-मल्टिप्लेक्स-हॉटेल्स अशा निवडक ठिकाणी रात्रजीवन सुरू करण्याचा विषय आहे. त्यामुळे पोलीस त्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवू शकतील, असेही  देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील प्रयोग यशस्वी झाल्यास पुणे, नागपूर अशा महानगरांतही रात्रजीवन सुरू करण्याबाबत विचार होईल, असेही देशमुख यांनी सूचित केले.

भाजपमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील भाजप सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे तपशील समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे हे गृह विभागाला देणार आहेत. ते तपशील-कागदपत्रे मिळाल्यावर भाजपच्या मंत्र्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, असे  देशमुख यांनी सांगितले.