खटल्याविना कारागृहात खितपत पडलेल्या कैद्यांच्या मुद्दय़ावर बोट

मुंबई : शहरी नक्षलवादप्रकरणी वैद्यकीय जामिनाच्या प्रतीक्षेत असताना नुकतेच निधन झालेले धर्मगुरू स्टॅन स्वामी यांच्या कामाबाबत आदर असल्याचे नमूद करून खटल्याविना वर्षांनुवर्षे कारागृहात खितपत पडलेल्या कैद्यांच्या मुद्दय़ावर उच्च न्यायालयाने सोमवारी बोट ठेवले. कैद्यांना खटल्याविना किती काळ कारागृहात खितपत ठेवायचे? जलद खटला हा प्रत्येक आरोपीचा मूलभूत अधिकार आहे, असेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.

स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने स्टॅन स्वामी यांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते व त्यांच्या कामाबाबत आम्हाला आदर असल्याचे म्हटले. आम्हाला न्यायालयीन कामातून फारसा वेळ मिळत नाही; परंतु स्वामी यांचा अंत्यविधी (ऑनलाइन पद्धतीने) पाहिला. त्या वेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल केलेली भाषणे ऐकली. स्वामी हे अद्भुत व्यक्ती होते आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाचा आम्हाला आदर आहे. कायदेशीरदृष्टय़ा त्यांच्याविरोधात जे काही आरोप आहेत तो एक वेगळा मुद्दा आहे, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.