भीमा- कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत उमटत आहेत. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी लोकल सेवा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे हार्बर, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून मेट्रोची सेवाही बंद झाली आहे. सामान्य नागरीक आणि विद्यार्थ्यांचे यामध्ये सर्वाधिक हाल होत असल्याचे चित्र आहे. मुंबई विद्यापीठाच्या अनेक विभागांच्या आज परीक्षा होत्या. जे विद्यार्थी ३ वाजताच्या पेपरला वेळेत पोहचू शकणार नाहीत त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

आजच सकाळी विद्यापीठातर्फे परीक्षा रद्द होणार नसून विद्यार्थ्यांनी १ तास उशीरा पोहोचले तरी चालेल असे सांगितले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने एक परीपत्रक काढले. त्यानुसार महाराष्ट्र बंद आणि आंदोलनामुळे विद्यार्थी वेळेत पोहचू शकत नसल्याने जे पोहचू शकणार नाहीत त्यांचा पेपर पुन्हा घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये बंदमुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. काही मार्गांवर रेल्वे अडवल्याने रेल्वेच्या नियमित वेळापत्रकापेक्षा रेल्वे उशीराने धावत आहेत. तर दुसरीकडे आंदोलक रस्त्यांवर उतरल्याने तेथील वाहतूकही थंडावली असल्याचे चित्र आहे. यामुळे बी.ए, बीएससी, बी.कॉम, बी.सीए आणि एल.एल.बी या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.