आंदोलन यशस्वी करण्यासाठी नव्या क्लृप्त्या

शिवसेना आणि कडकडीत ‘मुंबई’ किंवा ‘महाराष्ट्र बंद’ असे वर्षांनुवर्षांचे समीकरण होते. मुंबईने अनेकदा ते अनुभवलेही. मात्र आता कदाचित समीकरणे बदलत आहेत, याचाच अनुभव बुधवारी मुंबईने घेतला. शिवाय या बंदच्या मोर्चेबांधणीमध्ये झालेला बदलही पाहिला. बुधवारचा बंद हा त्यापैकीच एक होता. पूर्वी केवळ मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे रोखून धरली की मुंबई बंद व्हायची. पण आता परिस्थिती बदलली असून आता दोन्ही द्रुतगती महामार्गही तेवढेच महत्त्वाचे आहेत. या खेपेस नवा वाहतूक मार्ग अर्थात मेट्रोही रोखून धरण्यात आला.

रस्त्यावर उतरणारे आक्रमक शिवसैनिक हे यापूर्वीच्या मुंबई आणि महाराष्ट्र बंदचे वैशिष्टय़ होते. या खेपेस त्या आक्रमक भूमिकेत होते ते भीमसैनिक. मोटारबाइकच्या पूर्वीच्या शिवसेनेच्या भगव्याची जागा या खेपेस निळ्या झेंडय़ांनी घेतली. आक्रमकता मात्र तीच होती. महिला आणि लहान मुलांचाही मोठा सहभाग हे बुधवारच्या आंदोलनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़. याची सुरुवातही शिवसेनेनेच मुंबईत केली होती. महिला शिवसैनिकांची आक्रमक फळी त्यावेळेस पुढे असायची. शिवाय या खेपेस आंदोलन हाताळताना आक्रमकता टाळण्याचे आदेश पोलिसांना असल्याने त्यांनीही आंदोलकांसंदर्भात मवाळ भूमिका घेतली.

शहरामध्ये आता मोटारसायकलची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्याचा परिणाम बुधवारी बंदमध्ये वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला. द्रुतगती महामार्ग मोर्चा व आंदोलकांनी रोखल्यानंतर पोलिसांनी तो मोकळा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोटरसायकल आणि रिक्षा व इतर वाहनांमधून कार्यकर्ते पुढच्या टप्प्यावर जाऊन पुढचा मार्ग रोखून धरत होते, पश्चिम द्रुतगती महामार्गावर हीच पद्धती आंदोलकांनी हाताळलेली दिसली. मागाठाणे येथे रोखून धरलेला मार्ग मोकळा केल्यानंतर ठाकूर संकुलाचा पूल पार करून कार्यकर्ते पुढचा मार्ग रोखून धरत होते. हाच अनुभव मालाड, गोरेगाव असे करत अंधेरीपर्यंत येत होता. शिवाय आजवरचे नेहमीचे माहीत असलेले मार्ग रोखून धरण्याची  आंदोलकांची ठिकाणेही यंदा बदललेली होती. या खेपेस उड्डाण पुलांच्या अलीकडे आणि पलीकडे मार्ग रोखून धरण्याचे नवे तंत्र पाहण्यात आले.