23 October 2018

News Flash

Maharashtra Bandh : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी १ तास उशीरा येण्याची मुभा

विद्यापीठाने दिले स्पष्टीकरण

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदचा परिणाम सामान्य जनजीवनावर झाला आहे. अनेक शाळा आणि कार्यालयांनीही बंदचा त्रास होऊ नये म्हणून सुट्ट्या दिल्या आहेत. आज विधी आणि इंजिनियरींगबरोबरच एकूण १३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आहेत. परंतु बंदमुळे त्या रद्द केल्या जाणार नाहीत असे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे. मुंबईमध्ये बंदमुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. काही मार्गांवर रेल्वे अडवल्याने रेल्वेच्या नियमित वेळापत्रकापेक्षा रेल्वे उशीराने धावत आहेत. तर दुसरीकडे आंदोलक रस्त्यांवर उतरल्याने तेथील वाहतूकही थंडावली असल्याचे चित्र आहे.

शहरात अशाप्रकारचे वातावरण असताना परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र परीक्षा नियोजित वेळेतच होईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना थोडी सूट दिली जाणार असल्याचेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. परीक्षेच्या वेळेपेक्षा एक तास उशीरा आले तरीही विद्यार्थ्यांना पेपर देता येईल. त्यामुळे ज्यांचे पेपर सकाळी ११ ला आहेत त्यांनी १२ पर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचले तरी चालेल, तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर दुपारी ३ वाजता आहे ते विद्यार्थी ४ वाजेपर्यंत पोहोचले तरी चालणार आहे. त्यामुळे काहीसा उशीर झाला तरीही वेळेची मुभा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

First Published on January 3, 2018 12:06 pm

Web Title: bhima koregaon violence maharashtra band mumbai university exams will be today only student can come 1 hour late