भीमा कोरेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद; वाहनांची मोडतोड, ठिकठिकाणी जाळपोळ; चेंबूर ते मुलुंड पट्टय़ात आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्यांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी मुंबई तसेच आसपासच्या शहरांत उमटले. चेंबूर ते मानखुर्द आणि घाटकोपर ते मुलुंड या पूर्वनगरांत ठिकठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ व वाहनांची मोडतोड केली. काही ठिकाणी दुकानांनाही लक्ष्य करण्यात आले. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण दुपापर्यंत दादर, मालाड, कांदिवली, वरळी या भागांतही पसरले. ठाणे तसेच नवी मुंबई या शहरांतही काही भागांत दगडफेक, जाळपोळ आणि निदर्शनांच्या घटना घडल्या. या आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीला बसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले.

भीमा कोरेगाव येथील दगडफेकीच्या घटनेनंतर मुंबईतील दलितबहुल भागांत तणावपूर्ण वातावरण होते. मंगळवारी सकाळपासून या तणावाने हिंसक रूप घेतले. सकाळी साडेदहाच्या सुमारास चेंबूर नाका येथील वाहतूक आंदोलकांनी बंद केली. त्यामुळे शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. यावेळी काही बेस्ट बसच्या काचा फोडण्यात आल्या तसेच रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. पोलिसांनी तासभर प्रयत्न करून आंदोलकांना येथून हटवले. मात्र, दंगेखोरांचा मोर्चा पूर्व द्रुतगती मार्गाकडे वळला. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी, उड्डाणपूल, अमर महल जंक्शन या भागांत आंदोलकांनी मोठय़ा प्रमाणात दगडफेक केली तसेच खासगी वाहनांचेही नुकसान केले. अमर महल जंक्शन येथे आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडत पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली. समजूत काढूनही आंदोलक हटेनासे झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी लाठीमार केला. मात्र, याला प्रत्युत्तर देत पी. एल. लोखंडे मार्ग येथून चारशे-पाचशे जणांच्या जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. आंदोलकांतील एका जमावाने चेंबूर रेल्वे स्थानकात धाव घेऊन रेल्वेची वाहतूकही अडवली.

घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी येथेही आंदोलनकर्त्यांनी पूर्व द्रुतगती मार्ग अडवून धरला. या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात मोडतोड करण्यात आली. अनेक बसच्या चाकांची हवा काढण्यात आल्याने त्या भररस्त्यात उभ्या कराव्या लागल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पूर्व द्रुतगती मार्गावर हे चित्र दिसून येत होते.

चेंबूर परिसरातून सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान जमावाने ठिकठिकाणची दुकाने बळजबरीने बंद करायला लावली. जमावाचा हिंसक पवित्रा पाहून चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर भागातील दुकाने मंगळवारी दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.

पक्ष कार्यालये लक्ष्य

चेंबूर नाका परिसरातील शिवसेना शाखा व भाजपच्या पक्ष कार्यालयाची आंदोलनकर्त्यांनी मोडतोड केली. शिवसेना शाखेच्या काचा फोडून आतील सामानाचीही नासधूस करण्यात आली. कार्यालयाबाहेरील वाहनांनाही लक्ष्य करण्यात आले. शाखेवर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच चेंबूर परिसरातील शिवसैनिक मोठय़ा संख्येने या ठिकाणी जमा झाल्याने तणावात आणखी भर पडली.

चित्रणास मज्जाव

दगडफेक, जाळपोळ सुरू असताना त्याचे चित्रण आपल्या मोबाइल कॅमेऱ्यांत करू पाहणाऱ्यांनाही आंदोलकांनी लक्ष्य केले. काही जणांचे मोबाइल जबरदस्तीने काढून घेऊन त्यातील छायाचित्रे व व्हिडीओ डिलिट करण्यात आले तर, काही ठिकाणी मोबाइल फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

सामान्यांना त्रास

अचानक हिंसक बनलेल्या या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेले नोकरदार रस्ते व रेल्वे वाहतूक बंद पडल्याने एकाच जागी अडकून पडले. द्रुतगती मार्ग तसेच शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेकांनी वाहनांतून उतरून पायी प्रवास सुरू केला. मात्र, दगडफेकीच्या घटनांमुळे धड पुढेही जाता येईना व मागेही फिरता येईना, अशी त्यांची अवस्था झाली. महिला व विद्यार्थीवर्गाला या आंदोलनाची झळ बसली.

दुपारनंतर परळ-दादर बंद

पूर्व उपनगरांत सुरू झालेल्या हिंसाचाराचे वृत्त पसरताच दादर, परळ, हिंदमाता परिसरातही अस्वस्थता पसरली. या परिसरातील कार्यकर्त्यांनी भीमा-कोरेगाव हिंसेविरोधात रॅली काढली होती. हातामध्ये निळे झेंडे घेतलेले कार्यकर्ते सरकारविरोधी घोषणाबाजी करीत होते. प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. यामध्ये तरुणांबरोबरच मोठय़ा संख्येने महिलांचाही सहभाग होता. या कार्यकर्त्यांना आवेश पाहून दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली.

मालाड, कांदिवलीतही पडसाद

कांदिवली पूर्वेकडील दामूनगर येथील भीमनगर परिसरात आंदोलकांनी मंगळवारी सकाळी निषेध व्यक्त केला. कांदिवली पूर्व परिसरातील सर्व दुकाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. कांदिवली पूर्व परिसरात व मरोळ परिसरात एक बेस्ट बसदेखील आंदोलकांकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.  गोरेगाव भगतसिंग नगर, दिंडोशी, विटभट्टी, मालाड पूर्व, मालवणी, कांदिवली पूर्व, अंधेरी पूर्व, दहिसर परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता.