भिराचे तापमान ४६ अंश से. वर पोहोचले आणि त्याची चर्चा सर्वत्र झाली. कारण कोकणपट्टय़ात असलेल्या भिराचे तापमान हे पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाशी अधिक मिळते जुळते असल्यामुळे  इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत भिराच्या तापमानात अचानक झालेली वाढ ही सर्वानाच अचंबित करणारी होती.

दर उन्हाळ्यात राज्यात येणारी उष्णतेची लाट काही नवीन नाही. मात्र या वेळी उन्हाच्या लाटेपेक्षा चर्चेत राहिले ते भिराचे तापमान. मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात भिराचे कमाल तापमान ४६ अंश से. वर नोंदले गेले. त्या दिवशी जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या ठिकाणांच्या क्रमवारीत भिरा दुसऱ्या क्रमांकावर आले आणि देशपातळीवर भिराची चर्चा सुरू झाली. तापमानात नवीन विक्रम करणे, हेदेखील नवे नाही. गेल्या वर्षी राजस्थानमध्ये तापमानाचा पारा विक्रमी अंशावर नोंदविला गेला होता.  फलोडी येथे मे महिन्यात तब्बल ५१ अंश से. तापमान नोंदले गेले. देशातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले. यापूर्वी राजस्थानमधल्याच अलवार येथे १९५३ मध्ये ५०.६ अंश से.पर्यंत तापमानाची नोंद झाली होती (जगातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद कॅलिफोर्निया येथील डेथ व्हॅलीमध्ये १० जुलै १९१३ रोजी ५६.७ अंश से. झाली आहे.). राजस्थानमधील वाळवंटी भागातच नाही, तर महाराष्ट्रातील नागपूर-अमरावती पट्टय़ातील अनेक ठिकाणे उन्हाळ्यात जगातील सर्वाधिक तापमानाच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांत असतात. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आलेल्या उष्णतेच्या लाटेत अमरावती विभागातील अकोला अनेकदा सर्वाधिक तापमानात पहिल्या क्रमांकावर होते.

सामान्यांसाठी भिराचे तापमान ही नवलाची गोष्ट असली तरी हवामानाशी संबंधित यंत्रणा, संशोधक यांना मात्र भिराच्या तापमानाची कल्पना आहे. तीनही ऋतूंत भिराला टोकाचे (एक्स्ट्रीम) हवामान पाहायला मिळते. उन्हाळ्यात भिरातील तापमापकाचा पारा ४२-४४ अंशांपर्यंत चढणे नेहमीचेच आहे. वाद होता तो तापमान ४६ अंश से.पर्यंत जाण्याचा. आजूबाजूच्या परिसरातील तापमान ४२ अंश से.पर्यंत तापमान दाखवत असताना भिराचे तापमान खूपच जास्त होते. त्यानंतर भिरातील तापमापक यंत्रणा योग्य आहे की नाही ते पाहण्यासाठी हवामानशास्त्र विभागाने अधिकारी पाठवले व त्यांनी यंत्रणा योग्य असल्याचा निर्वाळाही दिला. तरीही रायगडमध्ये म्हणजे तसे कोकण पट्टय़ात असतानाही भिराचे तापमान एवढे कसे वाढते याचे गूढ सर्वानाच वाटले.

किनाऱ्यावरील गावे आणि किनाऱ्यापासून दूर असणारी ठिकाणे यांच्या तापमानातील नोंदीमध्ये नेहमीच फरक असतो. तो फरक म्हणजे दिवसा व रात्रीच्या तापमानातील अंतर. ज्याला हवामानशास्त्रीय भाषेत कमाल व किमान तापमान असे म्हणतात. दुपारी सूर्य माथ्यावर असताना तापमान सर्वोच्च बिंदू गाठते तर रात्री जमीन थंड होऊ  लागल्यावर सकाळी सूर्योदयाआधी तापमान नीचांकी पातळी असते. समुद्रकिनाऱ्यांवरील गावांमध्ये म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी हा फरक फारसा जाणवत नाही. याचे कारण म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाण. समुद्र जवळ असल्याने किनारपट्टी भागात हवेतील वाफेचे प्रमाण हिवाळ्याचा अपवाद वगळता जास्त असते. हवेतील वाफ उष्णता धरून ठेवते. त्यामुळे दुपारचे तापमान नियंत्रणात राहते. त्याच वेळी बाष्पाने तापमान धरून ठेवल्याने रात्री पारा फारसा खाली उतरत नाही. त्यामुळे मुंबईतील कमाल व किमान तापमानातील फरक साधारणत: आठ ते दहा अंश से.पर्यंत असतो. जसजसे राज्याच्या आतील भागात, समुद्रापासून दूर जाऊ  लागतो, तसे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. हवा कोरडी झाल्याने दुपारच्या उन्हाची तीव्रता रात्रीच्या तापमानात खाली उतरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे शहर. उन्हाळ्यात जर मुंबईचे तापमान ३४ अंश से. असले तरी घामामुळे जीव हैराण होतो तर तिकडे पुण्यामध्ये तापमान साधारण ४० अंश से. असले तरी त्याची दाहकता जाणवते, पण घाम मात्र फारसा येत नाही. ही सर्व कमाल हवेतील बाष्पाची आहे.

रायगड जिल्ह्य़ात पूर्वेकडे भिरा वसले असून येथील धरणावर मोठा विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळेच येथे हवामानशास्त्र विभागाचे अंशकालीन हवामान केंद्रदेखील आहे. उन्हाळ्यात कोकणातील इतर केंद्र ३५-३६-३७ अंश से. कमाल तापमान दाखवतात, मात्र त्याच वेळी भिराचे तापमान ४२-४३-४४ अंश से.ची पातळी गाठत असते. तर ही परिस्थिती हिवाळ्यात अगदी विपरीत असते. मुंबई, रत्नागिरी या भागात किमान तापमान १८-१७-१६ अंश से.पर्यंत उतरत असताना भिराची वाटचाल मात्र १२-११-१० अंश से. अशी सुरू असते.

हवामान केंद्रातील तापमानाची तफावत

मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन ठिकाणी हवामानाची केंद्र आहेत. या दोन्हीतील भूअंतर हे साधारण २० किलोमीटर असेल. मुंबई शहर हे बेटावर वसले असल्याने दोन्ही केंद्र ही समुद्राजवळ आहेत. तरीही या दोन्ही केंद्रांमध्ये कमाल व किमान तापमानात कायमच अंतर असते. कमाल व किमान तापमानात सांताक्रूझ हे कुलाब्यापेक्षा अधिक तापमान दाखवते. उदा. कुलाब्यात कमाल तापमान ३२ अंश असेल तर सांताक्रूझमध्ये ते ३५ अंश से. असते. तर कुलाब्यात किमान तापमान १७ अंश से. असेल तर सांताक्रूझमध्ये तापमानाची नोंदही ते १४-१५ अंश से. असते. याचे कारण कुलाब्याचे केंद्र हे किनाऱ्यावर आहे तर सांताक्रूझ येथील केंद्र हे पूर्वेकडे विमानतळाजवळ आहे. त्यामुळेच एकाच पट्टय़ात आणि अवघ्या काही किलोमीटरवर असूनही कुलाबा व सांताक्रूझमधील तापमानात फरक असल्याचे, हवामानशास्त्रानुसार स्पष्ट होते. भिरा परिसराची ठेवण ही डोंगराळ व मध्यभागी साठलेले पाणी अशी आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी जमीन तापून त्यातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या उष्णतेमुळे या भागातील तापमान वाढ होत असते, तर हिवाळ्यात हवा कोरडी असल्याने रात्री तापमान पटकन खाली उतरते.

प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com