भिवंडीतील खाडीपार परिसरात काल रात्री एक तीन मजली इमारत शेजारच्या चाळीवर कोसळली. या घटनेत एका २५ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. परंतु या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एकूण ९ लोक अडकले होते. रात्रीपासून अग्निशमन दल आणि ‘एनडीआरएफ’ टीम युद्धपातळीवर मदतकार्य करत होती. त्यामुळे सकाळपर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात यश आले.

ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यामुळे नगरपालिकेने इमारत खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इमारत पूर्णपणे खाली करण्यात आली होती. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.

याबाबत बोलताना NDRFचे अधिकारी महेश नलावडे म्हणाले की ही इमारत मोडकळीस आलेली होती. ती धोकादायक स्थितीत होती आणि म्हणून ती रिक्त करण्यात आली होती. इमारतीचा भाग कोसळला आणि जवळच्या चाळीवर पडला. या चाळीत काही लोक राहत होते. ते ढिगाऱ्याखाली अडकले होते. मात्र आता साऱ्यांची सुटका करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र या घटनेत १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असेही ते म्हणाले.

इमारत कोसळली तेव्हा ती शेजारील चाळीवर कोसळली. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली एकूण ९ लोक अडकले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांमध्ये ५ स्त्रिया, ३ पुरुष आणि एका २ वर्षीय बालकाचा समावेश होता. या सर्व जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेत २५ वर्षीय खेरेनिसा इस्माईल शेख या तरुणीचा मृत्यू झाला.