भिवंडी-खाडीपार भागात मंगळवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. मात्र सकाळपर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात यश आले असून एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या चाळीवर ही इमारत कोसळल्याने रात्रीपासून अग्निशमन दल आणि ‘एनडीआरएफ’ टीम युद्धपातळीवर मदतकार्य करत होती. अखेर आज सकाळपर्यंत ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाबाबत घटनास्थळी भेट दिली. ‘घडलेली घटना हि अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत केवळ ६ वर्षे जुनी होती. इमारत कोसळल्यामुळे या इमारतीचे बांधकाम नीट केले नसल्याचे सिद्ध होते. बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे इमारत कोसळण्याची ही घटना घडली आणि या घटनेत एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, या संबंधी कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

या ढिगाऱ्याखाली एकूण ९ लोक अडकले होते. सर्व जणांना बाहेर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांमध्ये ५ स्त्रिया, ३ पुरुष आणि एका २ वर्षीय बालकाचा समावेश होता. मात्र या घटनेत २५ वर्षीय खेरेनिसा इस्माईल शेख या तरुणीचा मृत्यू झाला.