03 April 2020

News Flash

Chhagan Bhujbal scam in tourism corporation: पर्यटन महामंडळातही भुजबळांची दादागिरी?

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना खिरापत वाटल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीतील कंपनीचा १७ कोटींचा गंडा; निविदा न मागविता ‘डेक्कन ओडिसी’चे व्यवस्थापन

सार्वजनिक बांधकाम विभागातच नव्हे तर पर्यटनाचा कार्यभार सांभाळतानाही सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना खिरापत वाटल्याचे दिसून येत आहे. पर्यटन महामंडळाने चालविण्यासाठी घेतलेल्या ‘डेक्कन ओडिसी’ या आरामदायी ट्रेनची जबाबदारी दिल्लीतील एका कंपनीकडे सोपविण्यात आली; परंतु या कंपनीने महामंडळाला चक्क १७ कोटींचा गंडा घातला. भुजबळ पर्यटनमंत्री असेपर्यंत ही वसुली करण्याची हिंमतही महामंडळाला झाली नाही. आता मात्र महामंडळाने वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे.

दिल्लीतील मे. दि लक्झरी हॉलिडेज् या कंपनीला २०११ ते २०१४ असे तीन वर्षांचे कंत्राट देताना नियमानुसार देय असलेली अनामत रक्कमही घेण्यात आली नाही तसेच अशा प्रकरणी निविदाही मागविण्यात आल्या नाहीत. या कंपनीने सुरुवातीला एक कोटींची रक्कम थकविली तेव्हा महामंडळाने पैशासाठी तगादा लावला.

तेव्हा कंपनीने दोन कोटींचा धनादेश भरला, परंतु तोही वटला नाही. तरीही त्या वेळी काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर या कंपनीने सलग तीन वर्षे एक छदामही महामंडळाकडे जमा केला नाही. तरीही पैसेवसुलीसाठी महामंडळाने प्रयत्न केले नाहीत. विशेष म्हणजे या सेवेपोटी मध्य रेल्वेला देय असलेली कोटय़वधी रुपयांची रक्कम महामंडळाने आपल्या तिजोरीतून अदा केली. महामंडळाच्या इतिहासात कंत्राटदारावर पहिल्यांदाच इतकी मेहेरनजर दाखविण्यात आल्याचे दिसून येते.

भुजबळ हे पर्यटनमंत्री असताना या कंपनीला झुकते माप देण्यात आले. अनामत रक्कम या कंपनीने भरली नाहीच, परंतु महामंडळाला देय असलेली रक्कमही दिली नाही. याबाबत तत्कालीन अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता लगेच भुजबळांकडून दबाव येत असे. याविरुद्ध आपण उच्च न्यायालयात २०१४ मध्ये जनहित याचिकाही दाखल केली आहे, असा उघड आरोप महामंडळाच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप आजगावकर यांनी केला आहे. १७ कोटींच्या वसुलीचे हे प्रकरण सध्या महामंडळात चांगलेच गाजत आहे. महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी या वसुलीसाठी जोरदार पुढाकार घेतला आहे. वसुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही जैन यांनी ‘लोकसत्ता’कडे स्पष्ट केले.

मे. लक्झरी हॉलिडेज् या कंपनीविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ कोटींच्या वसुलीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा टाकण्यात आला आहे. या कंपनीचे कामकाज बंद करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. स्विस लक्झरी हॉलिडेज् ही कंपनी त्यांनी स्थापन केल्यामुळे स्विस दूतावासाला या कंपनीच्या घोटाळ्याबाबत सांगण्यात आले आहे. याशिवाय देशातील सर्व पर्यटन महामंडळांना पत्र लिहून या कंपनीने केलेल्या फसवणुकीची माहिती देण्यात आली आहे.

–  पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 3:07 am

Web Title: bhujbal also hold in tourism corporation
टॅग Bhujbal
Next Stories
1 ईशान्य मुंबईवर शिवसेनेचे खास लक्ष
2 ‘वांद्रय़ाचा साहेब कोण?’
3 महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सात जणांना अंतरिम जामीन
Just Now!
X