अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर आता कारवाईची कार्यकर्त्यांची भीती
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाच्या प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची जवळीक असताना अटक टाळणे शक्य नव्हते का, असा सवाल भुजबळ समर्थकांकडून केला जात आहे.
भुजबळ यांच्यासह अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. भुजबळांच्या अटकेनंतर कारवाई इथेच थांबणार की अन्य नेत्यांची तीच गत होणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाढत्या जवळीकीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. ही पाश्र्वभूमी असतानाही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्याला तुरुंगात जावे लागल्याबद्दल वेगळी कुजबुज सुरू झाली आहे. भुजबळ यांची अटक ही न्यायालयाच्या आदेशामुळे झालेली नाही. भुजबळांसारख्या नेत्याच्या अटकेपूर्वी शासकीय पातळीवर विचारविनिमय झाला असणार. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांसाठी आपले वजन दिल्लीदरबारी खर्ची घातले नाही का, अशीही चर्चा आहे.
भुजबळांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीला टीकेचे धनी व्हावे लागणार आहे. आधीच भुजबळ, अजित पवार आणि तटकरे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम झाला होता आणि त्याचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला होता. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर भुजबळ कायम शरद पवारांबरोबरच राहिले. पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा भुजबळ यांनी पक्ष उभारणीत महत्त्वाची भूमिका बजाविली. पक्षाचे मुख्यालय सुरुवातीला ए-१० या भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी सुरू करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. कोणत्याही निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबविणे, आर्थिक रसद पुरविण्यात भुजबळ हे आघाडीवर असायचे. इतर मागासवर्गीय समाजावर त्यांचा प्रभाव असल्याने पक्षाच्या उमेदवारांकडून भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला यावे, असा सर्वाचा आग्रह असायचा. राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय असा सुप्त वाद सुरू झाला आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या मनातून भुजबळ उतरले. भुजबळांचा पत्ता कापण्याचे प्रयत्न पक्षातून झाले. तेलगी घोटाळ्यात भुजबळांचे नाव आल्यावर पक्षाने त्यांना घरचा रस्ता दाखविला होता. तेव्हा राष्ट्रवादी सोडण्याच्या बेतात भुजबळ होते, पण पवारांनी त्यांचे पंख असे काही कापले की इतर पक्षांमध्ये जाण्याचे त्यांचे दोर कापले गेले.

तेलगीमध्ये वाचले, पण..
तेलगी घोटाळ्यात छगन भुजबळ यांचे नाव आले होते. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त रणजित शर्मा, सहआयुक्त (गुन्हे) श्रीधर वगळ यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली होती. तेलगी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष चौकशी पथकाने भुजबळांच्या भोवताली फास आवळला होता, पण तेव्हा सुदैवाने भुजबळ बचावले होते. बांधकाम घोटाळ्यात मात्र भुजबळांचे दिवस भरले.