||निशांत सरवणकर
मुख्यमंत्री, शरद पवार यांची उपस्थिती
मुंबई : बीडीडी चाळ प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होण्यास लागणाऱ्या विलंबापोटी म्हाडाला दरदिवशी तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. हा प्रकल्प तात्काळ सुरु करण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हाडाच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून येत्या मंगळवारी (२७ जुलै) वरळी प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकल्पाच्या ठिकाणी भूमिपूजन होणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. दक्षिण आशियाई देशांतील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प असल्याचा दावाही त्यांनी केला.

‘बीडीडी चाळ प्रकल्पात पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरु करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असलेले ‘सिटी स्पेस’ या सामाजिक संस्थेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले असून पर्यावरण परवानग्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे या प्रकल्पातील पुनर्वसनाच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करणे सहज शक्य आहे,’ असे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले.

नायगाव व ना. म. जोशी मार्ग प्रकल्प चार वर्षांपूर्वी तर वरळी प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाने एल अँड टी, शापुरजी पालनजी व टाटा-कॅपिसिट कन्स्ट्रक्शन कंपनी अशा बड्या विकासकांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली. नायगाव प्रकल्पाचे अजिबात काम सुरू झालेले नाही तर ना. म. जोशी मार्ग प्रकल्पात संक्रमण शिबिर बांधण्यात आले आहे. वरळी येथे संक्रमण शिबिराचे काम सुरू झाले होते. परंतु सत्ताबदल होताच विद्यमान महाविकास आघाडी सरकारने संक्रमण शिबिर बांधण्याचा बेत रद्द केला आणि थेट पुनर्वसनाच्या इमारती बांधण्याचे ठरविले. मात्र त्यामुळे पुन्हा वरळी येथील प्रकल्पाचे काम सुरू होण्यास विलंब झाला.  आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि आरक्षणात बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, असेही आव्हाड यांनी सांगितले.

म्हाडाचे दरदिवशी तीन कोटींचे नुकसान!

तिन्ही प्रकल्पांच्या कामापोटी दरदिवशी म्हाडाचे तीन कोटींचे नुकसान होत आहे. तीनपैकी वरळी प्रकल्पातील टाटा-कॅपिसिट कन्स्ट्रक्शन कंपनीने काम सुरू झालेले नसतानाही आतापर्यंत झालेल्या खर्चाचे देयक सादर केले आहे. ते पावणे तीनशे कोटींच्या घरात आहे. अद्याप नायगाव व ना. म. जोशी मार्ग प्रकल्पातील कंत्राटदारांनी अद्याप देयक सादर केलेले नाही. निविदेतील अटीनुसार,पुनर्वसन इमारतीच्या पायाचे काम होत नाही तोपर्यंत कंत्राटदारांना देयक मिळणार नाही असे स्पष्ट असतानाही हे देयक अदा करता यावे यासाठी आटापिटा सुरूआहे.