आरोग्य विभागाचा निर्णय; झोपडपट्टी भागांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सेवा

संदीप आचार्य, मुंबई</strong>

मुंबईतील झोपडपट्टी तसेच अडनिडय़ा भागात रुग्णवाहिका जाण्यास अडचण होते अशा ठिकाणी मोबाइल रुग्णवाहिच्या धर्तीवर आता ‘सायक ल रुग्णवाहिका’ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. एकूण वीस सायकल रुग्णवाहिका चालविण्यात येणार असून प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत एक पॅरामेडिको असणार आहे.

मुंबईत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तसेच गतिमान आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही संकल्पना राबविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून झोपडपट्टी परिसराबरोबरच दादरच्या शिवाजी पार्क परिसरातही सायकल रुग्णवाहिके ची व्यवस्था असणार आहे.

या योजनेत रुग्णवाहिकेचे कार्यक्षेत्र साधारणपणे दीड ते दोन किलोमीटर एवढे राहणार असून १०८ क्रमांकावर फोन केल्यानंतर त्याच्या माध्यमातून ही सायकल रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. या रुग्णवाहिकेवर असलेल्या पॅरामेडिकोकडील मोबाइलशी १०८ क्रमांकाची सेवा जोडलेली असेल, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. प्रत्येक रुग्णवाहिकेवर वयोवृद्ध रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे व उपकरणे ठेवली जातील. मात्र गंभीर स्वरूपाचे रुग्ण असल्यास त्यांच्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही या डॉक्टरांनी सांगितले.

या रुग्णवाहिकेवर रक्तदाब मोजणारे उपकरण, साखर निश्चित करण्यासाठी ग्लुकोमीटर, पल्सऑस्किमीटर, आयव्ही सेटसह आवश्यक उपकरणे असणार आहेत. एका सायकल रुग्णवाहिकेचा खर्च साधारणपणे २१ हजार रुपये असून यात सायकलची किंमत ५१०० रुपये, जीपीएस डिव्हाइसची किंमत आठ हजार रुपये, सॉफ्टवेअर तीन हजार रुपये तर वैद्यकीय उपकरणांची किंमत पाच हजार रुपये असेल.

वर्षांसाठी वीस सायकल रुग्णवाहिकांचा खर्च २८ लाख ८० हजार एवढा येणार असून रुग्णाच्या घरी जाऊन सर्वप्रथम पॅरामेडिको आजाराच्या तीव्रतेनुसार उपचार करेल. दीड ते दोन किलोमीटर परिसर हे रुग्णवाहिकेचे कार्यक्षेत्र असल्यामुळे १०८ क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ रुग्णाच्या घरी पोहोचणे शक्य होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्याप्रमाणेच राष्ट्रीय शहरी आरोग्यसेवा बळकट करण्याला माझे प्राधान्य आहे. शहरांकडे येणारे वाढते लोंढे यातून निर्माण होणारी निमशहरी व्यवस्था लक्षात घेता आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरांमध्ये आरोग्य सेवेचे व्यापक जाळे निर्माण करण्याची गरज आहे. सायकल रुग्णवाहिका ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून त्याच्या उपयुक्ततेचा अभ्यास करून अधिक परिणामकारक सेवा निर्माण केली जाईल.

एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री