अर्चना त्यागी व आशुतोष डुंबरे मुंबईत सहआयुक्तपदी

सुमारे ७०हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रशासनात उलथापालथ घडविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलाकडे वळविला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पोलीस दलात मोठे फेरबदल करताना भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ८७ ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह १३७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलातील प्रशासन, वाहतूक आणि आर्थिक गुन्हे शाखा या विभागांना नवे सहआयुक्त मिळणार आहेत. मुंबईतील प्रशासन विभागाचे अनुपकुमार सिंग, वाहतूक विभागाचे मिलिंद भारंबे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे प्रवीण साळुंखे या सहआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याजागी अनुक्रमे राज्य पोलीस दलाच्या प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांची नियुक्ती गृहविभागाने केली. कुमार यांची बदली मुंबईत झाल्याने औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर सोपवण्यात आली. तर कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक एम. बी. तांबडे यांना सोलापूरचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. तर कोल्हापूरच्या अधिक्षकपदी मुंबईचे उपायुक्त संजय मोहिते यांना नियुक्त करण्यात आली. याशिवाय अनेक जिल्हयांचे अप्पर अधीक्षक व अधीक्षक बदलण्यात आले आहेत. दरम्यान, त्यागी विशेष पोलीस महानिरिक्षक श्रेणीतील सेवाज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना बढती मिळणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी त्यांची बदली करण्यात आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्यांना कधी मुहूर्त मिळणार, अशी चर्चा पोलीस दलात आहे.

अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या खालील प्रमाणे(कुठून कुठे) आहेत. संतोष रस्तोगी(सहआयुक्त एसआयडी-सहपोलीस आयुक्त, नवीमुंबई), नवल बजाज(पोलीस अकादमी, नाशिक-विशेष पोलीस महानिरिक्षक, कोकण परिक्षेत्र), प्रशांत बुरूडे(पोलीस महानिरिक्षक, कोकण परिक्षेत्र-पोलीस अकादमी, नाशिक), मिलिंद भारंबे(सहआयुक्त, मुंबई-विशेष पोलीस महानिरिक्षक, औरंगाबाद), विठ्ठल जाधव(विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती-कारागृह, पुणे), सी. एच. वाकडे(विशेष पोलीस महानिरिक्षक, पुणे कारागृह-अमरावती परिक्षेत्र), प्रविण साळुंखे(सहआयुक्त मुंबई-विशेष पोलीस महानिरिक्षक, मुंबई कारागृह), राजवर्धन(विशेष महानिरिक्षक, मुंबई कारागृह- सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग), मधुकर पांडे(सहआयुक्त, नवीमुंबई-ठाणे), सुनील रामानंद(सहआयुक्त, पुणे-विशेष महानिरिक्षक, सीआयडी), आर. जी. कदम(महानिरिक्षक, सीआयडी-सहआयुक्त पुणे), अजित पाटील(विशेष महानिरिक्षक, औरंगाबाद-सीआयडी), रावसाहेब शिंदे(अतिरिक्त आयुक्त, मुंबई- उपमहानिरिक्षक, गडचिरोली), प्रताप दिघावकर(अप्पर आयुक्त, मुंबई-ठाणे), मनोज लोहिया(अप्पर आयुक्त, मुंबई-मुख्य दक्षता अधिकारी, राज्य मार्ग परिवहन महामंडळ), लखमी गौतम(अधिक्षक, अमरावती-अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई), संदिप कर्णिक(उपायुक्त, एसआयडी-राज्य राखीव पोलीस बल, मुंबई), सत्यनारायण(उपायुक्त, मुंबई-अतिरिक्त आयुक्त, ठाणे), प्रविण पडवळ(उपायुक्त-अतिरिक्त आयुक्त, मुंबई), एस. जयकुमार(उपायुक्त-अतिरिक्त आयुक्त, मुंबई), अंकुश शिंदे(अधिक्षक, नाशिक-अतिरिक्त आयुक्त, नागपूर) याशिवाय औरंगाबाद, अकोला, अमरावती, नाशिक, परभणी, बुलढाणा, हिंगोली, अहमदनगर, सिंधुदूर्ग, पुणे, जळगाव, पालघर, चंद्रपूर, जालना, वर्धा, वाशिम, कोल्हापूर, मालेगाव येथील अतिरिक्त अधिक्षक, अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.