प्रादेशिक भाषांतील ध्वनिचित्रनिर्मितीवर बडय़ा कंपन्यांचा भर

मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे यूटय़ूब पाहणाऱ्यांची संख्या शेकडोच्या पटीने वाढत असताना प्रादेशिक भाषांमधील व्हिडीओंचा यातील वाटा सर्वात मोठा ठरत आहे. देशात यूटय़ूबवरून पाहिल्या जाणाऱ्या व्हिडीओंपैकी १६ टक्के व्हिडीओ प्रादेशिक भाषांमधील आहेत, तर ५९ टक्के हिंदी भाषेतील आहेत. नेमकी हीच बाब हेरून अनेक बडय़ा कंपन्यांनी आता प्रादेशिक भाषेतील व्हिडीओंच्या निर्मितीवर भर दिला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये प्रादेशिक भाषांचे व्हिडीओ तयार करण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. यामुळेच यूटय़ूबनेही डिसेंबर महिन्यात प्रादेशिक भाषांचे व्हिडीओ तातडीने उपलब्ध व्हावे या उद्देशाने ११ प्रादेशिक भाषांमध्ये व्हिडीओचे होमपेज सुरू केले. यामुळे प्रादेशिक भाषांमध्ये व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज देशात तब्बल १८ कोटी स्मार्टफोनधारक मोबाइलवर व्हिडीओ पाहतात. हे प्रमाण देशात यूटय़ूब पाहणाऱ्यांमध्ये ८० टक्के इतके आहे. स्मार्टफोनची कमी झालेली किंमत व डेटा युद्धामुळे मोबाइल इंटरनेटचे स्वस्त झालेले दर यामुळे निमशहरे तसेच ग्रामीण भागातून व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिणामी नवीन व्हिडीओंचे प्रमाणही वाढू लागले आहे. २०१६ मध्ये देशात ५०० नवीन व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था तयार झाल्या. तर या व्हिडीओंना एक लाखांहून अधिक प्रेक्षकही मिळाले. याचा अर्थ प्रत्येक व्हिडीओला दिवसाला किमान एक हजार दर्शक मिळत आहेत.

नव्याने तयार होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रादेशिक भाषांच्या व्हिडीओंचे प्रमाण जास्त आहेत व त्यांचे प्रेक्षकही वाढत आहेत असे मत यूटय़ूबच्या ऑनलाइन भागिदारी व विकास विभागाचे संचालक डेव्हिड पॉवेल यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात देशात विनोदी, मनोरंजन, संगीत, तंत्रज्ञान आणि खाद्यपदार्थ विषयांतील व्हिडीओंना मोठी मागणी असल्याचेही पॉवेल यांनी नमूद केले. यामुळेच वर्षभरात बीबी की वाइन्स, शेल्र्ली सीता, बीइंग इंडिया, कबिताज् किचन, विद्या वॉक्स, टेक्निकल गुरुजी, संदीप महेश्वरी, इन्फो बेल्स तेलुगू या व्हिडीओ निर्मात्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रादेशिक भाषांचा प्रवास असाच सुरू राहिला तर भविष्यात या भाषांमधील व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये दक्षिण भारतीय भाषा आघाडीवर असून मराठीचा प्रवासही आता वेगाने सुरू आहे. यामुळे नजीकच्या काळात मराठी व्हिडीओ पाहणाऱ्यांचे प्रमाणही वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

गावांमध्ये मोबाइल आणि इंटरनेट पोहोचल्यामुळे प्रादेशिक भाषांमध्ये व्हिडीओ पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळेच ‘सोनी लिव’सारख्या मोठय़ा कंपन्याही आता प्रादेशिक भाषांमध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. आम्ही नुकताच मराठी भाषेत खास डिजिटल माध्यमासाठी नवीन मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेला हिंदी मालिकेइतकेच दर्शक मिळाले आहेत. भविष्यात बंगाली, गुजराती अशा इतर प्रादेशिक भाषांमध्ये मालिकानिर्मिती करण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहोत.

उदय सोधी, कार्यकारी उपाध्यक्ष आणि डिजिटल व्यवसायप्रमुख, सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍स इं. प्रा. लि.