राज्याच्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने, राजकारण वेगवान झाले आहे. आपले आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी चाली आणि हालचाली सुरू झाल्या आहेत. आरोप-प्रत्यारोप, उखाळ्यापाखाळ्या, सवालजवाब आणि तू तू मैं मैं च्या आरोळ्यांनी आता राजकीय मैदानावर रणकंदन सुरू होईल आणि या सर्वाचे भविष्य मताद्वारे घडविण्याची ताकद असलेल्या मतदाराची निवडणूकपूर्व करमणूकही सुरू होईल. राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक प्रस्थापित राजकीय चेहरा होता. घडी होती. लोकसभा निवडणुकीत ही घडी विस्कटली आणि जुनी गणितेही बिघडली. आता नव्या गणितांनिशी निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. ही गणिते कोणती होती, नवी गणिते कशी असतील, बेरजा वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकारही कसे होतील, याचा लेखाजोखा मांडणारी मालिका, सत्तेचा महापट आम्ही सुरू करीत आहोत. उद्यापासून राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघांचे प्रतिबिंब या मालिकेतून मतदारांसमोर मांडले जाईल..
गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात राज्यात मोठय़ा प्रमाणावर नाराजी आहे. आता सरकार बदलले पाहिजे, असाही एक सूर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ताबदल होईल का, याचीच सर्वाना उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला तारणाऱ्या मोदी लाटेचा प्रभावही ओसरत चालल्याने विरोधकांना तितकेसे सोपे नसले तरी अवघडही नाही. अर्थात, महायुती आणि आघाडय़ा यांची समीकरणे कशी राहतात यावरच सत्तेचे वारे कसे राहतील हे अवलंबून आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारबद्दल जनमानसात फारशी चांगली भावना नाही. ही बाब सध्याच्या सत्ताधाऱ्यांना छळणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला निर्विवाद यश मिळाल्याने भाजप आणि शिवसेनेचा आत्मविश्वास बळावला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील २८८ पैकी २४० विधानसभा मतदारसंघांत महायुतीला आघाडी मिळाल्याने विधानसभा जिंकण्याची फक्त औपचारिकता उरली, असा महायुतीच्या नेत्यांचा समज झाला, पण यातूनच भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रांमध्ये कुरबुरी वाढत गेल्या. तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूत, सत्ताकारणावरूनच कमालीची कटुता निर्माण झाली आहे.
आघाडी सरकारच्या विरोधातील नाराजीमुळे महायुतीला वातावरण अनुकूल असले तरी भाजप आणि शिवसेनेत आधीपासून सत्तासंघर्ष सुरू झाला. मुख्यमंत्रीपदावर दोघांचाही डोळा आहे. मोदी लाटेने यश मिळाल्याने महायुतीमध्ये आमचाच वरचष्मा राहिला पाहिजे, अशी भाजपची अपेक्षा आहे. तर लोकसभेत भाजप पण विधानसभेत आम्हीच ही शिवसेनेची भूमिका आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळाले पाहिजे यावर सेनेचा भर आहे. त्यातच महायुतीमधील सर्व पक्षांना जास्त जागा हव्या आहेत. रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर या सर्वाच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. शिवसेनेला लांब ठेवून स्वबळाचा प्रयोग करण्याचे भाजपच्या गोटात घाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेचा चांगलाच फायदा झाला. पण रेल्वे दरवाढ, एकूणच महागाई यामुळे मोदी यांचा प्रभाव ओसरत गेला. केंद्रीय किंवा रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या पदरी फार काही हाती लागलेले नाही. भाजपसाठी हा मुद्दा काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकतो.
राजकीय समीकरणे कशी राहणार ?
काँग्रेसचा देशभर पार धुव्वा उडाला. राज्यात काँग्रेसला मोठे यश मिळेल, असे चित्र नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल स्वपक्षीय आणि राष्ट्रवादीत नाराजी आहे. स्वच्छ प्रतिमेच्या पृथ्वीराजबाबांना काँग्रेसने अभय दिले असले तरी पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांचे नेतृत्व कितपत यशस्वी ठरेल, याबाबत साशंकताच आहे. नारायण राणे यांच्या बंडामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. महायुती आणि आघाडी या दोन्हींमध्ये कुरबुरी वाढल्या असल्या तरी महायुती किंवा आघाडी कायम राहणे हे सध्याच्या सर्व मित्र पक्षांसाठी आवश्यक आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसची आणि भाजपला शिवसेनेची मैत्री नकोशी झाली आहे. विधानसभा निकालानंतर सत्तेसाठी वेगळी समीकरणे तयार होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेबाहेर राहणे अवघड जाईल. यातूनच भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील, अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाली असली तरी विधानसभेच्या वेळी पुन्हा उसळी मारण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी स्वत:चा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. लोकसभेच्या निकालाच्या आधारे राज्यात महायुतीला वातावरण पोषक असले तरी राज्य विधानसभेची निवडणूक लोकसभेप्रमाणे एकतर्फी होणार नाही हे मात्र निश्चित.