27 January 2021

News Flash

करोनाकाळातही दिवाळी अंकांना मोठा प्रतिसाद; मागणी वाढल्याने पुन्हा छपाई

सध्याच्या नकारात्मक वातावरणामुळे आलेले मानसिक साचलेपण घालवण्यासाठी वाचकांना दिवाळी अंक हवे आहेत

(संग्रहित छायाचित्र)

जाहिरातदारांनी फिरवलेली पाठ, प्रवासावरील निर्बंधांमुळे विस्कटलेली वितरण साखळी, वाचकांची कोलमडलेली आर्थिक बाजू अशा अडचणींमुळे यंदा दिवाळी अंकांना प्रचंड नुकसान सोसावे लागण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता खोटी ठरवत वाचकांनी दिवाळी अंकांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला आहे. यंदा कमी प्रती बाजारात येऊनही मागणी चांगली मिळाल्याने प्रकाशकांना अंकांची पुन्हा छपाई करावी लागली आहे.

सध्याच्या नकारात्मक वातावरणामुळे आलेले मानसिक साचलेपण घालवण्यासाठी वाचकांना दिवाळी अंक हवे आहेत. ‘ऋतुरंग’चा अंक बाजारात लवकर पोहोचल्याने पुन:पुन्हा आलेली मागणी पुरवता आली. एकूण तीन आवृत्त्या काढाव्या लागल्या. अनेक लेखकांनी मानधनही परत केले, अशी माहिती ‘ऋतुरंग’चे संपादक अरुण शेवते यांनी दिली.

दरवर्षी एक हजारहून अधिक दिवाळी अंक महाराष्ट्रात निघतात. जाहिराती नाहीत आणि विक्रीतूनही पैसे मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या वर्षी राज्यात ४०० ते ५०० अंकच निघाले. पैकी २०० अंक मुंबईतील आहेत, अशी माहिती ‘दिवाळी वार्षिकांक समिती’चे (दिवा) प्रमुख कार्यवाह शिवाजी धुरी यांनी दिली. वितरणात अडचणी आहेत; पण वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काही अंकांच्या प्रती संपल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जगभरात १०० ठिकाणी प्रकाशन..

* ‘चपराक’ दिवाळी अंकाच्या १ लाख प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४६ हजार प्रतींसाठी पूर्वनोंदणी मिळाली. स्थानिक आमदारांनी काही प्रती घेऊन त्या घराघरांत पोहोचवल्या. उरलेल्या प्रती वितरकांकडे पाठवल्या. त्या आता संपत आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा काही प्रती छापाव्या लागतील, असे ‘चपराक’चे घनश्याम पाटील यांनी सांगितले.

* गेल्या काही वर्षांपासून आम्ही ग्रामीण भागात जाहिराती करत आहोत. त्यामुळे भेटवस्तू देण्यासाठी म्हणून लोक दिवाळी अंक खरेदी करतात. मुंबई, पुण्याकडचा केंद्रबिंदू आता ग्रामीण भागात सरकला आहे. शिवाय ‘चपराकठचा दिवाळी अंक २५ देशांमध्ये जातो. या वर्षी ९ नोव्हेंबरला जगभरात १०० ठिकाणी अंकाचे प्रकाशन झाले. त्यामुळे अशा परिस्थितीतही वाचक दिवाळी अंक खरेदी करणार याची खात्री होती. म्हणूनच दरवर्षीपेक्षा दुप्पट प्रती छापल्या, अशी माहिती पाटील यांनी दिली.

करोनाकाळाचा विचार करून अनेक प्रकाशकांनी सावधगिरीने अंक छापले. नेहमीच्या तुलनेत ३० टक्केच प्रती बाजारात आल्या. शिवाय वितरण साखळीही विस्कटली आहे. त्यामुळे दिवाळी अंकांची कमतरता जाणवू लागली. दिवाळी अंकांची मागणी वाढली, हा गैरसमज पसरला आहे. खरे तर तसे झालेले नाही; पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता अपेक्षेपेक्षा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथालये उशिरा उघडल्याने त्यांच्याक डून मागणी कमी आली आहे.

– हेमंत बागवे, बी. डी. बागवे आणि कंपनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:17 am

Web Title: big response to diwali ank even in corona abn 97
टॅग Coronavirus,Diwali
Next Stories
1 शिवाजी पार्कमध्ये सर्वाधिक ‘आवाज’
2 केंद्रीय अधिकाऱ्यांच्या अतिक्रमणाला राज्य अधिकाऱ्यांचा विरोध
3 १०० दुमजली बस लवकरच
Just Now!
X