‘राधे’, ‘सत्यमेव जयते २’च्या तारखा जाहीर; प्रतीक्षा मात्र ‘सूर्यवंशी’ची

मुंबई : अनेक राज्यांतून शंभर टक्के  चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून अडकून पडलेल्या बड्या निर्मात्यांच्या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होऊ लागल्या आहेत. सलमान खानने दरवर्षीप्रमाणे आपला ईदचा मुहूर्त ‘राधे’साठी धरला आहे, तर जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते २’चीही तारीख जाहीर झाली. मात्र चित्रपटगृह मालकांना रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची प्रतीक्षा आहे. या चित्रपटाचे निर्माते असलेल्या रिलायन्स एन्टरटेन्मेंटने ‘सूर्यवंशी’ मार्चमध्ये प्रदर्शित करायची तयारी सुरू के ली होती, मात्र चित्रपटाच्या फायद्याचे आर्थिक गणित कसे बसवायचे यावरून सध्या निर्माते आणि चित्रपटगृह मालक यांच्यात एकमत होत नसल्याने पुन्हा एकदा या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे.

सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट चित्रपटगृहांतूनच प्रदर्शित करावा, असे साकडेच बहुपडदा आणि एकपदडा चित्रपटगृहांच्या संघटनेने त्याला घातले होते. सलमाननेही गेल्या वर्षीच्या ईदचा मुहूर्त टळला होता, त्याची भरपाई करत यावर्षी १४ मे ही ईदची तारीख प्रदर्शनासाठी जाहीर के ली. त्यापाठोपाठ दोन वर्षांपूर्वी तिकीटबारीवर चांगली कमाई के लेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या सिक्वलसाठीही निर्मात्यांनी १२ मे ही तारीख जाहीर के ली आहे, त्यामुळे हे दोन्ही चित्रपट एकाच आठवड्यात प्रदर्शित होणार हे निश्चिात झाले आहे. तरीही त्याआधी ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित व्हावा, अशी चित्रपटगृह मालकांची इच्छा आहे. करोनाकाळानंतर लोकांना पुन्हा चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणायचे असेल तर ‘सूर्यवंशी’सारख्या पैसा वसूल मनोरंजक चित्रपटाची गरज आहे, असे चित्रपटगृह मालकांचे म्हणणे आहे. पण अजूनही मुंबई-महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह चालवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शिवाय, परदेशातही करोनाचा कहर असल्याने अनेक चित्रपटगृहे बंद आहेत. ही सगळी परिस्थिती लक्षात घेत रिलायन्स एन्टरटेन्मेंटने अद्याप चित्रपटगृहाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर के लेली नाही.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज असलेला ‘सूर्यवंशी’ आता जास्त काळ थांबवणे निर्मात्यांनाही अशक्य झाले आहे. चित्रपटासाठी गुंतवलेले पैसे आणि त्यावरील व्याज वाढत चालले असल्याने आणखी तोटा टाळण्यासाठी निर्मात्यांनी मार्चचा अखेरचा आठवडा किं वा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शनासाठी हालचाली सुरू के ल्या आहेत, असे सूत्रांकडून समजते. चित्रपटाचे आत्तापर्यंत झालेले आर्थिक नुकसान भरून काढावे यासाठी रोहित शेट्टी आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंटने या चित्रपटासाठी वितरकांकडून ७० टक्के  फायदा देण्याची मागणी के ली आहे. शिवाय, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शनासाठी आठ आठवड्यांचा कालावधी जावा लागतो, तोही काळ ४ आठवड्यांचा असावा, अशी मागणी त्यांनी के ली आहे. तर बहुपडदा चित्रपटगृहांच्या संघटनेनेही गेले वर्षभर व्यवसाय नसल्याने तोट्यात आहोत, हा मुद्दा पुढे करत ५५ टक्के  देण्याची तयारी दर्शवली आहे.